खिचडी वाटप प्रकरणी सूरज चव्हाण यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून ५ तास चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 06:24 AM2023-09-19T06:24:57+5:302023-09-19T06:25:43+5:30
फसवणूक, विश्वासघात, कट रचणे आदी कलमाअंतर्गत गुन्हा १ सप्टेंबरला दाखल करण्यात आला होता
मुंबई : माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती मानले जाणारे सूरज चव्हाण यांची आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी पाच तास चौकशी केली. खिचडी वितरण प्रकरणात चव्हाण यांची चौकशी करण्यात आली.
फसवणूक, विश्वासघात, कट रचणे आदी कलमाअंतर्गत गुन्हा १ सप्टेंबरला दाखल करण्यात आला होता. बाळा कदम, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंके, सुजित पाटकर, फोर्स व मल्टी सर्व्हिसेसचे भागीदार व कर्मचारी, स्नेहा कॅटरर्स, तत्कालीन सहायक आयुक्त (नियोजन), इतर पालिका अधिकारी व संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी सहा कोटी ३७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून, आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. यापूर्वी याप्रकरणी प्राथमिक चौकशी सुरू असतानाही चव्हाण यांची चौकशी करण्यात आली होती. पुढे गरज पडल्यास त्यांना पुन्हा बोलवण्यात येऊ शकते, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.