सुरतच्या मेंदूमृत दात्याचे उज्जैनच्या युवकाला ‘हात’; मुंबईत हाताचे यशस्वी प्रत्यारोपण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 02:36 PM2024-03-05T14:36:52+5:302024-03-05T14:37:33+5:30

या रुग्णाला आणखी काही महिने नियमित फिजिओथेरपी घ्यावी लागणार आहे.

Surat brain dead donor 'hands' to Ujjain youth; Successful hand transplant in Mumbai | सुरतच्या मेंदूमृत दात्याचे उज्जैनच्या युवकाला ‘हात’; मुंबईत हाताचे यशस्वी प्रत्यारोपण

सुरतच्या मेंदूमृत दात्याचे उज्जैनच्या युवकाला ‘हात’; मुंबईत हाताचे यशस्वी प्रत्यारोपण

मुंबई : विजेचा धक्का लागून दोन्ही हात आणि एक पाय गमावलेल्या उज्जैनच्या रुग्णावर मुंबईतील खासगी रुग्णालयात यशस्वी हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.  विशेष म्हणजे, सुरत येथील मेंदूमृत दात्याच्या कुटुंबीयांनी हात दान करण्याचा निर्णय घेतल्यामुळे रुग्णाला पुन्हा हात मिळाले आहेत. 

या रुग्णाला आणखी काही महिने नियमित फिजिओथेरपी घ्यावी लागणार आहे. परळ येथील ग्लोबल रुग्णालयात आतापर्यंत  १० रुग्णांवर हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. उज्जैन येथे स्टील फॅब्रिकेशन फॅक्टरीत काम करताना जीवेश कुशवाह  (३२) यास उच्च दाबाचा विजेचा धक्का लागला. दोन्ही हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली. जीव वाचविण्यासाठी त्याचा उजवा पाय आणि दोन्ही हात कापावे लागले होते. डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या अपघातानंतर कृत्रिम उजव्या पायाच्या सहाय्याने जीवेश उभा राहू शकत होता, मात्र तो चालू शकत नव्हता. जीवेशला ग्लोबल रुग्णालयात हाताचे  प्रत्यारोपण  शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती मिळाली. नोंदणी केल्यानंतर अवघ्या एका महिन्यात सुरत येथील मेंदूमृत दात्याकडून हात मिळाला. दात्याचे हात जीवेशची शरीरयष्टी, रंग आणि बाह्य स्वरूपाच्या दृष्टीने अगदी योग्य ठरले. दात्याचे  हात सुरत येथून आणण्यात आले. त्याचवेळी  जिवेश उज्जैनहून मुंबईत रुग्णालयात दाखल झाला. ही शस्त्रक्रिया १२ तासांपेक्षा जास्त वेळ सुरू होती. २ मार्च रोजी जीवेशला घरी सोडण्यात आले. 

ही शस्त्रक्रिया खरोखरच आव्हानात्मक होती. जीवेशला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे विच्छेदनानंतर गंभीर जखमा झाल्या होत्या. या शस्त्रक्रियांमध्ये रुग्णाची इच्छाशक्ती फार महत्त्वाची असते. पुढील ६ ते ९ महिन्यांत हातांच्या हालचालींमध्ये आणखी प्रगती होईल. रुग्णाला यापुढे इम्युनोसप्रेशन औषधे घ्यावी लागणार आहेत.  दात्याच्या कुटुंबीयांनी हात दान करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे शक्य झाले. आपल्याकडे मेंदूमृत व्यक्ती हात दान करू शकतात.
- डॉ. नीलेश सातभाई, प्रमुख, हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभाग, ग्लोबल रुग्णालय
 

Web Title: Surat brain dead donor 'hands' to Ujjain youth; Successful hand transplant in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.