लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गामा फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सूरताल कराओके सिंगिंग स्टार या हिंदी गीतगायन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. १८ ते ४५ आणि ४६ ते ८० अशा वयोगटांमध्ये रंगलेल्या या स्पर्धेत अनुक्रमे शरद जगताप, स्नेहा कांबळे आणि मिलिंद कुलकर्णी, रश्मी लुकतुके हे स्पर्धक विजयी झाले. तर उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी स्मिता चंदावरकर यांची निवड करण्यात आली.
या स्पर्धेची अंतिम फेरी फेसबुकच्या माध्यमातून संपन्न झाली. कोरोनाला हरवून लावण्यासाठी अहोरात्र लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांना ही स्पर्धा समर्पित करण्यात आली होती.
सध्याच्या कठीण काळात गुणी हौशी कलावंतांच्या गायन छंदाला योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हाही हेतू या स्पर्धेमागे होता. एकूण २५० सहभागी स्पर्धकांतून १२ स्पर्धकांची स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड करण्यात आली होती. संगीत संयोजक प्रशांत लळित व गायिका विद्या करलगीकर यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. फ्रंटलाईन कोरोना योद्धा असलेले डॉ. राहुल जोशी स्पर्धेच्या दरम्यान यात सहभागी झाले होते. त्यांच्या कार्यकाळातील अनुभवकथन त्यांनी यावेळी केले.
--------------------------------------------------------------------