सुरेंद्र गडलिंग यांची तात्पुरती जामिनावर सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:06 AM2021-07-31T04:06:23+5:302021-07-31T04:06:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एल्गार परिषद व शहरी नक्षलवादप्रकरणी आरोपी असलेले सुरेंद्र गडलिंग यांची उच्च न्यायालयाने शुक्रवारी ...

Surendra Gadling released on temporary bail | सुरेंद्र गडलिंग यांची तात्पुरती जामिनावर सुटका

सुरेंद्र गडलिंग यांची तात्पुरती जामिनावर सुटका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एल्गार परिषद व शहरी नक्षलवादप्रकरणी आरोपी असलेले सुरेंद्र गडलिंग यांची उच्च न्यायालयाने शुक्रवारी तात्पुरती जामिनावर सुटका केली. व्यवसायाने वकील असलेल्या गडलिंग यांच्या आईचे निधन गेल्या वर्षी झाले. काही धार्मिक विधी करण्यासाठी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. सध्या तळोजा कारागृहात असलेले गडलिंग हे १३ ऑगस्ट ते २१ ऑगस्टपर्यंत कारागृहाबाहेर असणार आहेत.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये गडलिंग यांच्या आईचे निधन झाले. त्यावेळी गडलिंग यांच्या घरातील सर्व मंडळींना कोरोनाचा संसर्ग झाल्याने ते रुग्णालयात होते, तर काहींचे विलगीकरण करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या आईच्या काही धार्मिक विधी राहिल्या होत्या. त्या पूर्ण करण्यासाठी सुरेंद्र गडलिंग यांनी विशेष न्यायालयात जामीन अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला. त्यामुळे गडलिंग यांनी आपली तात्पुरती जामिनावर सुटका करण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. या अर्जावरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे होती.

गडलिंग यांच्या आईचे वर्षश्राद्ध असल्याने राहिलेल्या विधी पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे त्यांचा तात्पुरता जामीन अर्ज मंजूर करावा, अशी विनंती गडलिंग यांच्या वकिलांनी न्यायालयाला केली.

न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत गडलिंग यांना त्यांचा पासपोर्ट एनआयएकडे जमा करण्याचे निर्देश दिले. तसेच त्यांच्या प्रवासाच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहितीही एनआयएला देण्याचे निर्देश दिले.

तसेच ५० हजार रुपयांचे दोन हमीदार सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. तसेच ते जामिनावर असताना नागपूर शहर सोडून जाऊ शकत नाही. केवळ आईच्या रक्षा विसर्जनासाठी १६ ऑगस्ट रोजी नागपूर सोडून जाऊ शकतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

एल्गार परिषदप्रकरणी सुरेंद्र गडलिंग यांना पुणे पोलिसांनी ६ जून २०१८ रोजी अटक केली. त्यांचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: Surendra Gadling released on temporary bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.