वैद्यकीय कारणास्तव सुरेश जैन यांची जामिनावर सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 03:16 AM2019-11-21T03:16:02+5:302019-11-21T03:16:27+5:30
घरकूल घोटाळा; उच्च न्यायालयाने तीन महिन्यांसाठी तात्पुरती केली सुटका
मुंबई : कोट्यवधी रुपयांच्या घरकूल घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेले राज्याचे माजी मंत्री सुरेश जैन यांची वैद्यकीय कारणास्तव तीन महिन्यांसाठी उच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरती जामिनावर सुटका केली.
जळगावच्या २९ कोटी रुपये घरकूल घोटाळ्याप्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने सुरेश जैन यांच्यासह ४७ जणांना दोषी ठरवले. जैन यांना भ्रष्टाचाराप्रकरणी सात वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावित १०० कोटींचा दंड ठोठाविला. सर्व आरोपींनी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला
उच्च न्यायालयात आव्हान दिले.
दरम्यान, जैन यांनी तब्येत ठीक नसल्याने उपचारासाठी जामिनावर सुटका व्हावी म्हणून उच्च न्यायालयात अर्ज केला. यावरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती. बुधवारच्या सुनावणीत न्यायालयाने जैन यांना उपचार करण्याकरिता तीन महिन्यांचा तात्पुरता जामीन पाच लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर मंजूर केला.
७६ वर्षांचे सुरेश जैन यांची प्रकृती गंभीर असून ते मुंबईत उपचार घेत आहेत. खटल्यादरम्यान त्यांनी चार वर्षे कारावास भोगला, असा युक्तिवाद जैन यांचे वकील आबाद पौडा यांनी केला. न्यायालयाने या अर्जावरील पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी ठेवली. सध्या जैन हे फर्लोवर आहेत. जैन यांच्यासह सत्र न्यायालयाने माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी नगरसेवक व काही अधिकाऱ्यांना घरकूल हाउसिंग प्रकल्प घोटाळ्यासाठी दोषी ठरविले.
जळगावच्या हद्दीबाहेर ५ हजार घरांचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र, त्यापैकी १५०० घरेच बांधण्यात आली. याबाबत जळगाव महापालिकेचे माजी आयुक्त प्रवीण गेडाम यांनी २००६ मध्ये तक्रार नोंदविली. ८ सप्टेंबर रोजी जैन यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.