मुंबई : विकासाला विवेकाची जोड महत्त्वाची असते. पर्यावरण संवर्धनासंबंधी सद्गुरू वामनराव पै यांनी अनेक कामे केली. मानव जीवनासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचे महत्त्व त्यांनी लोकांना आपल्या कृतीतून पटवून दिले. त्यामुळे सुरेश खानापूरकर यांना मिळालेला जीवनगौरव पुरस्कार सद्गुरूंच्या कार्याला मिळालेली जोड आहे, असे प्रतिपादन जीवन विद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद पै यांनी केले.समाज प्रबोधनाचा वसा घेतलेल्या सदगुरू श्री वामनराव पै प्रणीत ‘जीवन विद्या मिशन’च्या हीरक महोत्सवासानिमित्त आयोजित जीवनगौरव पुरस्कार सोहळा शनिवारी घाटकोपर पंतनगर येथे पार पडला. या वेळी प्रल्हाद पै बोलत होते. जीवन विद्या मिशनतर्फे देण्यात येणारा ‘सद्गुरू श्री वामनराव पै जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ भूजल तज्ज्ञ व शिरपूर पॅटर्नचे प्रणेते, महाराष्ट्राचे वॉटर मॅन सुरेश खानापूरकर यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी जीवन विद्या मिशनचा ६० वर्षांचा इतिहास उलगडणारा विशेषांकही उपस्थितांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. या वेळी माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, माजी मंत्री गणेश नाईक, माजी कामगार मंत्री हेमंत देशमुख, चंद्रशेखर ओक उपस्थित होते.भूवैज्ञानिक म्हणून ३३ वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात खानापूरकरांनी जलसंधारणाचे काम केले आहे. (प्रतिनिधी)
सुरेश खानापूरकर यांना जीवनगौरव पुरस्कार
By admin | Published: December 27, 2015 12:47 AM