मुंबई - मुंबई व गुजरातमध्ये खंडणी, खून, अपहरणाच्या प्रकरणातील आरोपी व कुख्यात गुंड सुरेश जगूभाई पटेल यांची ३ कोटी ८९ कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये त्याच्या पत्नीच्या नावे असलेल्या २३ अचल मालमत्तांचादेखील समावेश आहे. या अचल मालमत्तांची खरेदी त्याने गुन्हेगारी कृत्यातून कमावलेल्या पैशांतून केली असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सुरेश पटेल याच्याविरोधात दमण, गुजरात आणि मुंबईत अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. खंडणी, खून, अपहरण, भ्रष्टाचार, अवैधरित्या शस्त्र बाळगणे असे या गुन्ह्यांचे स्वरूप आहे. दहशतीच्या माध्यमातून त्याने कोट्यवधींची माया गोळा आहे. या प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी जून महिन्यामध्ये त्याच्या व त्याच्या साथीदारांच्या घरावर छापेमारी केली.
सुरेश याच्या घरातून १ कोटी ३४ लाख रुपये मूल्याचे दागिने, तसेच १ कोटी ७ हजार रुपये मूल्याची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. तर त्याच्या बँक खात्यात असलेले २० लाख ९० हजार रुपयेदेखील जप्त केले होते. तसेच त्याच्या एका साथीदाराच्या घरातून २२ लाख ६८ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. मंगळवारी ईडीने केलेल्या जप्तीच्या कारवाईनंतर सुरेश पटेल याच्याकडून आतापर्यंत ६ कोटी ७३ लाख रुपयांची एकूण जप्ती झाली आहे. तर, त्याच्या आणखी मालमत्तेचा शोध अधिकारी घेत आहेत.