Join us

मुंबई पोलिसांची मध्यरात्री क्लबवर धाड; सुरेश रैनासह अनेक सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल

By कुणाल गवाणकर | Published: December 22, 2020 12:30 PM

विमानतळ परिसरातील क्लबवर पोलिसांचा मध्यरात्री छापा; कोरोना प्रतिबंधात्मक नियम पालन न झाल्यानं कारवाई

मुंबई: विमानतळाजवळ असलेल्या ड्रॅगन फ्लाय क्लबवर मध्यरात्री पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी ३४ जणांवर गुन्हा दाखल केला असून यामध्ये बड्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी क्लबमध्ये क्रिकेटपटू सुरेश रैना उपस्थित होता. त्याच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आयपीसीच्या कलम १८८, २६९, ३४ आणि एनएमडीएच्या काही कलमांतर्गत पोलिसांनी एकूण ३४ जणांविरोधात गुन्ह्यांची नोंद केली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन न केल्यानं ही कारवाई केली गेली आहे.मुंबई पोलिसांनी रात्री साडे तीनच्या सुमारास विमानतळाजवळ असलेल्या ड्रॅगन फ्लाय क्लबवर छापा टाकला. त्यावेळी तिथे पार्टी सुरू होती. या पार्टीला क्रिकेटपटू सुरेश रैनासह गायक गुरु रंधावा, अभिनेता ऋतिक रोशनची माजी पत्नी सुझॅन आणि इतरही काही सेलिब्रिटी उपस्थित असल्याचं समजतं. पोलिसांनी या प्रकरणी ३४ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये २७ ग्राहक आणि ४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.जेडब्ल्यू मॅरिएट येथे असलेल्या ड्रॅगन फ्लास क्लबवर पोलीस उपायुक्त जैन, पोलीस निरीक्षक यादव यांच्या पथकानं छापा टाकला. मुंबईत लॉकडाऊनचे नियम लागू आहेत. त्यामुळे रात्री ११ नंतर कोणत्याही प्रकारच्या पार्टीचं आयोजन करण्यास बंदी आहे. मात्र ११ नंतरही ड्रॅगन फ्लाय क्लबमध्ये पार्टी सुरू होती. त्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या २७ ग्राहकांपैकी १९ जण दिल्लीहून आले आहेत. तर अन्य ग्राहक पंजाब आणि दक्षिण मुंबईचे रहिवासी आहेत. यापैकी बहुतांश जणांनी मद्यपान केलं होतं. 

टॅग्स :सुरेश रैना