मुंबईत मालमत्ता खरेदी-विक्रीला ‘झळाळी’; १० महिन्यांत १ लाख व्यवहारांची नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 09:44 AM2023-10-25T09:44:32+5:302023-10-25T09:45:27+5:30
यंदा पहिल्या दहा महिन्यांतच व्यवहारांनी उच्चांक गाठला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : चालू वर्षाच्या पहिल्या १० महिन्यांत मुंबईत तब्बल १ लाख मालमत्तांच्या व्यवहारांची नोंदणी झाली आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. गेल्या वर्षी, अर्थात २०२२ मध्ये मुंबईत एकूण १ लाख २२ हजार मालमत्तांच्या नोंदणीचे व्यवहार झाले होते. यंदा पहिल्या दहा महिन्यांतच व्यवहारांनी उच्चांक गाठला आहे.
प्राप्त माहितीनुसार, यापैकी सर्वाधिक नोंदणी ही मार्च महिन्यात झाली असून, या महिन्यात एकूण १३ हजार १५१ मालमत्ता नोंदल्या गेल्या आहेत, तर एप्रिलमध्ये १० हजार ५१४ व जून महिन्यात १० हजार ३१९ मालमत्ता नोंदल्या गेल्या. आयकर विभागातर्फे गृह खरेदीदारांना विशिष्ट रकमेवर अतिरिक्त कर वजावट मिळण्याची मुदत मार्च महिन्यापर्यंत होती. त्यामुळे मार्चमध्ये सर्वाधिक मालमत्तांची नोंदणी झाली.
चालू वर्षात मुंबईत महिन्याकाठी १० हजारांपेक्षा जास्त मालमत्तांचे व्यवहार होत त्यांची नोंद झाली आहे. त्यात नव्याच नव्हे तर सेकंड सेल किंवा थर्ड सेल अशा मालमत्तांच्या नोंदणीचादेखील समावेश आहे. ८२ टक्के मालमत्ता या निवासी स्वरूपाच्या असून, उर्वरित १८ टक्के मालमत्ता या व्यावसायिक किंवा अन्य स्वरूपाच्या आहेत. १० कोटी किंवा अधिक किमतीच्या घरांच्या विक्रीतही वाढ झाली.
जगात मुंबई १९ व्या क्रमांकावर
जागतिक क्रमवारीत मुंबई शहराने १९ वा क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये जागतिक क्रमवारीत मुंबईचा क्रमांक ९५ होता. जगातील तब्बल ७६ शहरांना मागे टाकत मुंबई १९ व्या क्रमांकावर धडकली आहे.
५७ टक्के मालमत्तांची किंमत १ कोटीपेक्षा जास्त
मोठ्या आकाराचे घर खरेदी करण्याचा ट्रेंड या वर्षात अधिक जोमाने वाढीला लागला असून यंदाच्या वर्षी झालेल्या एकूण व्यवहारात ५७ टक्के घरांच्या किमती या १ कोटी किंवा त्यापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे.
पश्चिम उपनगराला जास्त मागणी
मुंबई व उपनगरात गेल्या काही वर्षांत सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांपैकी काही कामे मुंबईच्या पश्चिम उपगरात पूर्ण झाली असून, तेथील सेवा कार्यान्वित झाली आहे. या पार्श्वभूमीवर नव्या खरेदीसाठी लोक आवर्जून पश्चिम उपनगरांना पसंती देत असल्याचे दिसून आले आहे.