भाभा रुग्णालयात अवघ्या १५ मिनिटांत शस्त्रक्रिया; ‘मायक्रोवेव्ह एब्लेशन’ तंत्रज्ञानाद्वारे थायरॉईड ग्रस्त महिलेला दिलासा

By सीमा महांगडे | Published: September 15, 2023 06:33 PM2023-09-15T18:33:29+5:302023-09-15T18:33:49+5:30

शस्त्रक्रियेनंतर अवघ्या २ तासांत महिलेला खाण्यास, बोलण्यास व चालण्यास डॉक्टरांनी परवानगी दिल्याची माहिती उपनगरीय रुग्णालयांच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली.

Surgery in just 15 minutes at Bhabha Hospital Relief for thyroid suffering woman through Microwave ablation technology | भाभा रुग्णालयात अवघ्या १५ मिनिटांत शस्त्रक्रिया; ‘मायक्रोवेव्ह एब्लेशन’ तंत्रज्ञानाद्वारे थायरॉईड ग्रस्त महिलेला दिलासा

भाभा रुग्णालयात अवघ्या १५ मिनिटांत शस्त्रक्रिया; ‘मायक्रोवेव्ह एब्लेशन’ तंत्रज्ञानाद्वारे थायरॉईड ग्रस्त महिलेला दिलासा

googlenewsNext

मुंबई: थायरॉईडच्या ग्रंथींमुळे घशाला सूज आल्याने खाण्या-पिण्यास त्रास होणार्‍या ३२ वर्षीय महिलेवर ‘मायक्रोवेव्ह एब्लेशन’ (एमव्हीए) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयात अवघ्या १५ मिनिटात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर थाॅयराईडवरील उपचारासाठी करण्यात आला.

शस्त्रक्रियेनंतर अवघ्या २ तासांत महिलेला खाण्यास, बोलण्यास व चालण्यास डॉक्टरांनी परवानगी दिल्याची माहिती उपनगरीय रुग्णालयांच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली. वांद्रे येथील मुंबई महानगरपालिकेच्या के. बी. भाभा रुग्णालयातील कान, नाक व घसा विभागात काही दिवसांपूर्वी घशाच्या दुखण्यामुळे त्रस्त असलेली ३२ वर्षीय संगीता (नाव बदललेले) ही महिला उपचारासाठी आली होती. या महिलेच्या वैद्यकीय तपासणीनंतर तिच्या घशातील थायरॉईड ग्रंथींना सूज असल्याचे आढळले.

अशा प्रकारची सूज आल्यास सामान्यपणे गळ्यावर छेद देऊन शस्त्रक्रिया करण्यात येते. ही शस्त्रक्रिया नाजूक व अवघड मानली जाते. या शस्त्रक्रियेला साधारणपणे २ तास लागतात. तसेच शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला काही दिवसांपर्यंत रुग्णालयात राहण्याबरोबरच चालणे, फिरणे, खाणे इत्यादींवर बंधने येतात. शस्त्रक्रियेमुळे गळ्यावर तयार होणारे व्रण आयुष्यभर राहतात‌. या बाबी लक्षात घेऊन डॉक्टरांनी एमव्हीए पद्धतीची सूक्ष्म शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

एमव्हीए तंत्रज्ञानामध्ये सोनोग्राफीच्या सहाय्याने व एक सूक्ष्म सुईद्वारे ही शस्त्रक्रिया करण्यात आली. अवघ्या १० मिनिटांत झालेल्या या शस्त्रक्रियेअंतर्गत सुईद्वारे थायरॉईडमधील बाधीत पेशी नष्ट करण्यात आल्या. या शस्त्रक्रियेत गळ्यावर कोणताही छेद देण्याची गरज नसते. त्यामुळे या महिला रुग्णाला पूर्ण भूल न देता शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन तासांनी या महिलेला बोलण्याची अनुमती देण्यात आली. तसेच चालण्याची, फिरण्याची व खाद्यपदार्थ खाण्याचीही परवानगी देण्यात आली.

अवघ्या काही तासांनंतर या महिलेची वैद्यकीय तपासणी करून तिला रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. या शस्त्रक्रियेचा कोणताही व्रण तिच्या शरीरावर नव्हता. एमव्हीए तंत्रज्ञान वापरून केलेल्या या शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच ही महिला दैनंदिन काम करू लागली, अशी माहिती भाभा रुग्णालयातील कान, नाक व घसा विभागातील डॉ. आम्रपाली पवार यांनी दिली.
 

Web Title: Surgery in just 15 minutes at Bhabha Hospital Relief for thyroid suffering woman through Microwave ablation technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.