कळवा रुग्णालयाला गरज शस्त्रक्रियेची

By admin | Published: June 19, 2014 01:08 AM2014-06-19T01:08:33+5:302014-06-19T01:08:33+5:30

ठाणे महापालिकेने आगामी काळात १५ नवीन अद्ययावत रुग्णालये तसेच त्या अनुषंगाने वैद्यकीय महाविद्यालय बांधण्याचे प्रस्तावित केले आहे

Surgery of Kalwa Hospital needed | कळवा रुग्णालयाला गरज शस्त्रक्रियेची

कळवा रुग्णालयाला गरज शस्त्रक्रियेची

Next

जितेंद्र कालेकर, ठाणे
ठाणे महापालिकेने आगामी काळात १५ नवीन अद्ययावत रुग्णालये तसेच त्या अनुषंगाने वैद्यकीय महाविद्यालय बांधण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात कोट्यवधींची तरतूदही केली आहे. ठाणेकरांच्या जीवाशी संबंधित हा मोठा प्रकल्प हाती घेण्यापूर्वी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि इतर रुग्णालयांमधील कारभार सुधारण्यात यावा. तसेच त्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जनमोर्चाने केली आहे.
कळव्याच्या छ. शिवाजी म. रुग्णालयाच्या इमारतीचे आराखडे शहर विकास विभागाकडून मंजूर केलेले नाहीत. इमारतींच्या नकाशाचे विकास प्रस्तावही शहर विकास विभागाकडे नाहीत. तरीही इमारतीमध्ये वाढीव बांधकाम तसेच बदल करण्यात आले आहेत. या रुग्णालयातील मॉड्युलर आॅपरेशन थिएटरचे (ओटी) २०१३ मध्ये उद्घाटन झाले. त्यासाठी १३ कोटींचा खर्च होऊनही त्याची दुर्दशा झाली असून ते पूर्णत: कार्यरत नाही. ओटीमध्ये पायाभूत सुविधेसाठी वापरण्यात येणारा आॅक्सिजन पॉवरड्रील योग्यरीत्या उपलब्ध नाही. ओटीसाठी १९९५-९६ मध्ये सुमारे २० लाखांची आॅर्थोस्कोपी मशिन खरेदी करण्यात आली होती. प्रत्यक्षात ५ ते ६ शस्त्रक्रियांनंतर ती भंगारात विकण्यात आली. या ठिकाणी आॅर्थोस्कोपी सर्जन तसेच आॅपरेटरही उपलब्ध नाहीत.
अतिदक्षता विभागात आवश्यक त्या प्रमाणात इंटेसिव्हिस्ट, प्रशिक्षित एमडी डॉक्टर, बालरोगतज्ज्ञ, प्लास्टिक सर्जन, एन्जियोग्राफिस्ट उपलब्ध नाही. तसेच युरो, न्यूरो आणि हार्ट सर्जरीही केली जाऊ शकत नाही. वैद्यकीय महाविद्यालयातील सीपीएस (कॉलेज आॅफ फिजिशिएन अ‍ॅण्ड सर्जन) स्नातकोत्तर पदविका या परीक्षेसाठी स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य देणे आवश्यक असताना गेल्या दहा वर्षांत या परीक्षेसाठी कळवा आणि त्या परिसरातील किती विद्यार्थ्यांना या परीक्षेस बसण्यासाठी निवडण्यात आले, याचीही चौकशी करण्यात यावी.
कोरस कंपनीजवळच्या निर्मलादेवी चिंंतामणी दिघे रुग्णालयातील दुसरा आणि तिसरा मजला विनावापर पडून आहे. तेथील ओटीही बंद असून केवळ मायनर ओटी सुरू आहे. ठामपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. केंद्रे यांच्या नियंत्रणाखाली हा विभाग सुरू असून महापालिकेच्या नियमावलीनुसार डॉ. केंद्रे हे एमडीपीएएसएम उत्तीर्ण नसून एमडीडीपीएच उत्तीर्ण आहेत.
अलीकडेच कळवा रुग्णालयात मोहम्मद शेख या मुलावर चुकीची शस्त्रक्रिया झाल्याने त्याला पाय गमवावा लागला. चौकशीत डॉ. अभय कुलकर्णी, डॉ. योगेश पाटील आणि डॉ. संजय सोपोरे हे दोषी आढळून आले. त्यानंतर या शेख कुटुंबीयांना दहा लाखांची भरपाई देण्यात आली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या मुलाचे आयुष्यभराचे नुकसान तर झालेच. परंतु, जनतेच्या करांमधून नुकसानभरपाईची रक्कम या कुटुंबाला द्यावी लागली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा भुर्दंड प्रामाणिक करदात्या ठाणेकरांना बसला आहे.
अशा प्रकारे सामान्य व गरीब जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या व करदात्या ठाणेकरांच्या पैशांची उधळपट्टी करणाऱ्या या सर्व संबंधित डॉक्टरांवर कारवाई होणे गरजेचे आहे. १५ नवीन रुग्णालयांवर कोट्यवधींचा खर्च करण्यापूर्वी या दोन रुग्णालयांच्या कारभारात आमूलाग्र सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. या संपूर्ण प्रकरणाची विशेष चौकशी समिती नेमून तिच्याद्वारे चौकशी करण्यात यावी. तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जनमोर्चाचे संयोजक चंद्रहास तावडे यांनी केली आहे.

Web Title: Surgery of Kalwa Hospital needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.