फुलराणी सायनाच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
By admin | Published: August 20, 2016 04:57 PM2016-08-20T16:57:44+5:302016-08-20T19:57:16+5:30
भारताची अव्वल फुलराणी सायना नेहवाल हिच्या गुडघ्यावर मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - पायदुखीमुळे त्रस्त झालेल्या फुलराणी सायना नेहवाल हिला शुक्रवारी रात्री अंधेरीच्या कोकिलाबेन धीरुभाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी तिच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर अर्थोस्कॉपिक शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर तिची प्रकृती स्थिर असून पुढचे काही दिवस तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सायना नेहवाल हिचा उजवा पाय दुखत होता. उजव्या पायाच्या गुडघ्याच्या वाटीजवळील हाड थोडे सरकले असल्यामुळे तिला वेदना होत होत्या. त्यामुळे शुक्रवारी सायना हैद्राबादहून मुंबईत आली. कोकिलाबेन रुग्णालयाच्या स्पोर्ट्स मेडिसीन विभागातंर्गत तिला दाखल करण्यात आले. तिच्या काही तपासण्या केल्यावर विभाग प्रमुख डॉ. दिनशॉ परडीवाला यांनी तिच्यावर अर्थोस्कॉपिक शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे डॉ. परडीवाला यांनी सांगितले.
सायना हिच्या सांध्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे गुडघ्याच्या वाटीपासून एक छोटेसे हाड सरकले होते. यामुळे तिला त्रास होत होता. तपासण्या केल्यावर तिला आराम मिळावा यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. त्याप्रमाणे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पुढचे काही दिवस तिला रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर तिच्या तपासण्या करुन तिला डिस्चार्ज घेण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)