लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. महिनाभरात शरद पवार यांच्यावर करण्यात आलेली ही तिसरी शस्त्रक्रिया आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी टि्वट करत शरद पवार रुग्णालयात भरती झाल्याची माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात भरती झाले. त्यांच्यावर गॉल ब्लॅडर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती सुधारत आहे, असे मलिक यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
पोटदुखीचा त्रास जाणवल्याने पवार यांना सर्वप्रथम ३० मार्चला ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. छोट्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना सात दिवसांचा विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. यापूर्वी शरद पवार यांच्यावर १२ एप्रिलला पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
.....................................