मुंबई : चेंबूर येथील पशुवैद्यकीय डॉ. दीपा कट्याल यांच्या दवाखान्यात नुकतेच ‘इंडियन कोब्रा’च्या तोंडाजवळील भागाची यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली. उरण येथून सर्पमित्र जयवंत ठाकूर यांनी जखमीवस्थेत नागाला उपचारासाठी चेंबूर येथे आणले होते. चेंबूरच्या डॉ. दीपा कट्याल यांच्या दवाखान्यात त्याला दाखल करण्यात आले. त्याच्यावर एक महिना उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती उत्तम झाल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.उरणमध्ये खोदकाम सुरू असलेल्या जागी नाग आढळून आला. त्याच्या तोंडातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. अशा स्थितीमध्ये त्याला ताब्यात घेणे सर्प मित्रांस योग्य वाटले नाही. परंतु त्याला ताब्यात घेतले नसते, तर त्याचा मृत्यू झाला असता. त्यामुळे सर्पमित्र जयवंत ठाकूर यांनी त्वरीत त्याला पकडून डॉ. मनोज भद्रे यांच्या मदतीने प्राथमिक उपचार सुरू केले. परंतु नागाची प्रकृती खालावत होती. शेवटी त्याला चेंबूरच्या पशु दवाखान्यात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू झाले. तसेच वनविभागाला याची माहिती कळविण्यात आली असून महेश इथापे, हकीम, अतुल कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.पशुवैद्यकीय डॉ. दीपा कट्याल यांनी यासंदर्भात सांगितले की, नागाच्या तोंडाच्या बाजूला विषाची पिशवी असते. तिथे जखम झाल्याने तिथून विष बाहेर येत होते. सतत विष बाहेर येत असल्यामुळे त्याचा डोळा निकामी होण्याची शक्यता होती. त्वरीत सापाला दवाखान्यात आणल्यामुळे त्याचा डोळा बचावला़
‘त्या’ नागाच्या तोंडावर शस्त्रक्रिया यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 1:29 AM