Join us

आॅटिझम झालेल्या महिलेवर शस्त्रक्रिया

By admin | Published: April 01, 2017 6:42 AM

‘डीप ब्रेन स्टिम्युलेशन’(डीबीएस) ही ब्रेन पेसमेकर या वैद्यकीय उपकरणांचे रोपण करणारी न्यूरोसर्जिकल शस्त्रक्रिया

मुंबई : ‘डीप ब्रेन स्टिम्युलेशन’(डीबीएस) ही ब्रेन पेसमेकर या वैद्यकीय उपकरणांचे रोपण करणारी न्यूरोसर्जिकल शस्त्रक्रिया मुंबईतील एका खासगी रुग्णालयात ७ मार्च रोजी यशस्वीरीत्या पार पडली. आशियात दुसऱ्यांदा अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा दावा रुग्णालयाने केला आहे. आॅटिझम व अपस्माराची रुग्ण असणाऱ्या महिलेवर डीबीएस सिस्टिमचे रोपण करण्यात डॉक्टरांना यश आले. हे तंत्रज्ञान आधीच्या डीबीएस साधनांपेक्षा अधिक प्रभावी आहे. याआधीच्या साधनांच्या बॅटरीचे आयुष्य अत्यल्प होते. ही बॅटरी बदलून घेण्याकरिता रुग्णांना दर ३-४ वर्षांनी वेदनादायक शस्त्रक्रिया करून घ्याव्या लागत असत. बोस्टन सायन्टिफिकच्या नव्या व्हेरसाईस सिस्टिममुळे बॅटरीचे आयुर्मान तब्बल २५ वर्षांनी वाढले आहे.मेंदूशी निगडित असलेली ही शस्त्रक्रिया अत्यंत किचकट असते. शस्त्रक्रियेदरम्यान अनेकदा डॉक्टरांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या रुग्णांमध्ये सतत येणाऱ्या कंपनांमुळे नकारात्मक विचार जास्त असतात. याचा परिणाम त्यांच्या कुटुंबीयांवरसुद्धा मोठ्या प्रमाणात होतो. ‘डीप ब्रेन स्टिम्युलेशन’द्वारे त्यांच्या मेंदूचे संतुलन साधणे शक्य होते. हा पेसमेकर ट्रेमरवरील उपचारांकरिता मेंदूतील विशिष्ट भागांना इलेक्ट्रिकल इंपल्स पाठवतो. या ट्रेमर्समुळे रुग्णांना लिहिणे, खाणे किंवा वस्तू हातात धरणे अशी दैनंदिन कामे करणे अवघड होते. ‘डीप ब्रेन स्टिम्युलेशन’ शस्त्रक्रिया केल्यानंतर या रुग्णांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली. या नव्या डीबीएस सिस्टमच्या दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीमुळे अनेक रुग्णांना अनेकवेळा शस्त्रक्रिया करून घेण्याची निकड दूर होऊन पूर्णपणे नवे आयुष्य सुरू करता येणे शक्य होईल, असे न्यूरोसर्जन डॉ. परेश दोशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)