मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील मालाड स्थानकावरील जिना उतरताना रेलिंगच्या तुटलेल्या भागावर बोट घासल्याने महिलेचे अर्धे बोट कापले गेले आहे. महिलेच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पुन्हा ४८ तासांनंतर शस्त्रक्रिया केली जाणार असून दुसरे बोट लावण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पश्चिम रेल्वे मार्गावरील मालाड स्थानकावरून सकाळी पावणेअकराच्या सुमारास प्रवास करत असताना मीनल उमराव या फलाट क्रमांक दोनवरील जिना उतरत होत्या. त्या वेळी तुटलेल्या रेलिंगवर त्यांचे उजव्या हाताचे बोट घासून कापले गेले. त्या वांद्रे येथील एका कंपनीत कॉम्प्युटर ऑपरेटरची नोकरी करतात.
रेल्वेच्या दुर्लक्षपणामुळे त्यांना बोट गमवावे लागले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून भरपाई म्हणून ५ हजार रुपये देण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. तर, महिलेवर सुरुवातीला प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर शस्त्रक्रिया केली आहे. आता पुढील ४८ तासांत पुन्हा एक शस्त्रक्रिया करून बोट बसविण्यात येणार आहे, असे डॉ. अमित आसगावकर यांनी सांगितले.