Join us

चीनवर सर्जिकल स्ट्राइक करा- उद्धव ठाकरे

By admin | Published: November 05, 2016 7:20 AM

सीमांच्या संरक्षणासाठी पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकसारखा हल्ला लेह-लडाखमध्ये घुसलेल्या चीनवरही करण्याची गरज असल्याचं मत सामनाच्या अग्रलेखातून मांडलं आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 5 - चीनकडून लडाखमध्ये करण्यात आलेल्या घुसखोरीवर सामन्याच्या अग्रलेखातून शिवसेनेचे  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. चीनच्या घुसखोरीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचं मत सामन्याच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलं आहे. लडाखपासून अरुणाचल-सिक्कीमपर्यंतच्या सीमा भागात चीनच्या कारवाया वर्षानुवर्षे सुरू आहेत. त्यापासून चीनला कोण रोखणार हा खरा प्रश्‍न आहे. सीमांच्या संरक्षणासाठी पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकसारखा हल्ला लेह-लडाखमध्ये घुसलेल्या चीनवरही करण्याची गरज असल्याचं मत सामनाच्या अग्रलेखातून मांडलं आहे. मात्र चीनवर असा हल्ला होईल का, असा प्रश्न मोदी सरकारला अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. सामन्याच्या अग्रलेखातील ठळक मुद्दे- पाकिस्तानात घुसून जो काही सर्जिकल स्ट्राइक झाला त्याचे कौतुक आम्हाला आहेच. मात्र जो सर्जिकल स्ट्राइक नावाचा प्रकार पाकिस्तानच्या बाबतीत झाला तोच जोरदार सर्जिकल स्ट्राइक चीनवर होईल काय? - लडाखमध्ये चिनी सैन्याने सरळ सरळ घुसखोरी केली आहे. बुधवारी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान लडाखमध्ये फक्त घुसलेच नाही तर मनरेगा योजनेंतर्गत तेथे जे सिंचन कालव्याचे काम सुरू होते ते रोखण्यात आले. ६० च्या आसपास चिनी सैनिक आमच्या हद्दीत घुसून आमची विकासकामे थांबवतात व हे चिनी सैनिक बेडरपणे तेथेच थांबतात याचा अर्थ काय घ्यायचा? - चिनी सैनिकांच्या या घुसखोरीविरोधात आमच्या सैनिकांनी नक्की काय कारवाई केली याचा खुलासा आता बोलघेवड्या संरक्षणमंत्र्यांनी करायलाच हवा. फक्त पाकिस्तानला दम देऊन चालणार नाही तर चीनने वेढलेल्या सीमांचे रक्षण करणेही संरक्षणमंत्र्यांचेच काम आहे, पण पाकिस्तानच्या विरोधात जाहीर सभांतून बोलले की हमखास टाळी पडते. या टाळीच्या राजकारणातून बाहेर पडून आता चीनच्या घुसखोरीकडे गांभीर्याने पाहावे लागेल. - लडाखमधील चिनी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या हवाई दलाचे सी-१७ ग्लोबमास्टर हे सर्वात मोठे वाहतूक विमान अरुणाचल प्रदेशात चीन सीमेलगत मेचुका येथे शुक्रवारी आपण यशस्वीपणे उतरविले. ग्लोबमास्टरच्या या यशस्वी लॅण्डिंगने आपण चीनला तर योग्य तो संदेश दिलाच, पण कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगाला आपण सज्ज आहोत हेदेखील दाखवून दिले. - चिनी सीमांबाबत आपण जागरूक राहायला हवे. पाकिस्तानला इंचभरही सरकू द्यायचे नाही व तिकडे चीन लडाख, लेह, अरुणाचलमध्ये हातभर आत घुसून टाळ्या वाजवतो आहे त्यावर काहीच बोलायचे नाही असेही होणे बरोबर नाही. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हे सध्या काश्मीरच्या दौर्‍यावर आहेत. उरी येथे जाऊन त्यांनी जवानांशी संवाद साधला हे योग्यच झाले. - आमच्या संरक्षणमंत्र्यांनी जवानांना असे सांगितले की, डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करा. सीमेपलीकडून कोणतीही आगळीक झाली तर शत्रूला चांगलाच झटका द्या. सगळ्या देशाला तुमच्या कामगिरीचा अभिमान आहे. संरक्षणमंत्री योग्य तेच बोलले. -सैनिकांच्या कामगिरीचा अभिमान कोणाला नाही! सैनिक हा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसतो. हिंदुस्थानच्या सीमा हाच त्याचा धर्म व राजकीय पक्ष. मग त्या सीमा जम्मू-कश्मीरच्या असोत नाहीतर चीन-बांगलादेशच्या. शत्रूला पुढे चाल करू द्यायची नाही हेच त्याचे ध्येय.