मुंबई : सुरेल आवाजाची देणगी लाभलेली गायिका हरगून कौर आणि दमदार आवाजाचा आश्वासक गायक प्रथमेश लघाटे यांचा लोकमतसूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने मंगळवारी देखण्या सोहळ्यात गौरव करण्यात आला. एक लाख रुपये आणि मानचिन्ह देऊन या गुणी कलाकारांचा सत्कार केला जात असताना रसिकांनी टाळ्यांचा अखंड कडकडाट करीत त्यांच्यावर आशीर्वादाची बरसात केली. पुरस्काराचे यंदाचे सातवे वर्ष आहे.
लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतीनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार दिले जातात. संगीत क्षेत्रातील मान्यवर आणि लाेकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात मंगळवारी साडेपाच तास हा सोहळा रंगला. या पुरस्कार सोहळ्यास साथ होती, भाषणांची नव्हे, तर सूर, ताल आणि लय यांची! तरुण कलाकारांच्या सुरेल सादरीकरणाने ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सोहळ्यास आरंभ झाला. सोहळ्याचे प्रास्ताविक लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी केले, तर मान्यवरांचे स्वागत विजय दर्डा यांच्यासह लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा आणि इंट्रियाच्या संचालिका पूर्वा कोठारी यांनी केले.
संगीत क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मानभारतीय संगीताची सेवा करणाऱ्या आनंदजी वीरजी शाह, हरिहरन, सतीश व्यास, कैलाश खेर, अनुराधा पौडवाल, उदित नारायण, पं. अजय पोहनकर, रूपकुमार राठोड आणि सोनू निगम या मान्यवरांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला.
भाषण नको, गाणी हवीतया सोहळ्यास उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांनी भाषण करण्याचे टाळले. त्याऐवजी एखादे गाणे गुणगुणावे, असे आवाहन विजय दर्डा यांनी केले. त्याला उदित नारायण यांनी तात्काळ ‘धरती सुनहरी अंबर नीला...’ या गाण्याने साद दिली, तर कैलाश खेर आणि हरिहरन यांनीही सुरांनीच भावना व्यक्त केल्या. हरिहरन यांनी माइक हाती घेताच प्रेक्षागृहातून ‘चप्पा चप्पा चरखा चले...’ असे शब्द आले आणि त्यांनी तोच सूर पकडून त्या गाण्याच्या दोन ओळी सादर केल्या. सतीश व्यास आणि पं. अजय पोहनकर यांनीही रसिकांना अभिवादन केले.
मान्यवरांची उपस्थितीविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार प्रफुल्ल पटेल, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, जपानचे कौन्सिल जनरल मिचिओ हराडा, इस्कॉनचे आध्यात्मिक गुरू गौर गोपालदास, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, सहपोलीस आयुक्त यशस्वी यादव, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, भाजप नेते आशिष शेलार, डाॅ. प्रतीत समदानी, डॉ. रुची समदानी, इंट्रियाच्या संचालिका पूर्वा कोठारी, ज्योत्स्ना दर्डा यांचे बंधू, उद्याेजक रमेश जैन, मॅडिसन वर्ल्डचे सॅम बलसारा, कवी आणि अभिनेते शैलेश लोढा, डाॅ. स्वाती लाेढा, प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर, शिल्पकार सूर्यकांत लाेखंडे, न्यूराेसर्जन डाॅ. केकी तुरेल, नेत्रराेगतज्ज्ञ डाॅ. सुंदर नटराजन, डाॅॅ. अशाेक कांचन गुप्ता, महाराष्ट्र लघू उद्योग विकास महामंडळाचे प्रवीण दराडे, गृह विभागाच्या सहसचिव पल्लवी दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दिग्गजांना आदरांजलीभारतीय संगीतातील अमूल्य योगदानाबद्दल भारतरत्न पं. भीमसेन जोशी, पद्मविभूषण पं. जसराज, पद्मविभूषण गुलाम मुस्तफा खान यांना आदरांजली वाहण्यात आली. पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास जोशी, पं. जसराज यांची कन्या दुर्गा जसराज, गुलाम मुस्तफा खान यांचे पुत्र मुर्तुझा मुस्तफा, कादीर मुस्तफा, रब्बानी मुस्तफा, हसन मुस्तफा यांचा या साेहळ्यात सन्मान करण्यात आला.
फडणवीस यांचे गाणेगायिका अमृता फडणवीस यांनी ‘दमादम मस्त कलंदर’चे सूर छेडले. तोच धागा पकडून विजय दर्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही गाणे गाण्याची विनंती केली. त्यावर फडणवीस म्हणाले, माझ्या गाण्याचा स्वतंत्र कार्यक्रम ठेवा, मी पुन्हा येईन. फडणवीस यांनी ज्योत्स्ना दर्डा यांच्या आठवणींनी उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली.
माझी पत्नी जोत्स्ना दर्डा हिच्या स्मरणार्थ सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार आयोजित करण्यात येत आहे. जोत्स्ना ही खऱ्या अर्थाने संगीताची साधक होती. जीवन चांगल्या प्रकारे जगायचे असेल, तर जगण्याला संगीताची जोड हवी, असे तिचे मत होते. सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा संगीत क्षेत्रातील दिग्गजांना अभिवादन, उदयोन्मुख गायक, गायिकांचा सन्मान यासाठी आहे.- विजय दर्डा, लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार
‘लोकमत’कडून गायकांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे. हे संगीतसेवेचे महान कार्य आहे. यामुळे उदयोन्मुख कलाकाराला प्रोत्साहन मिळत आहे. ‘लोकमत’ला ५० वर्षे पूर्ण झाली, त्याबद्दल खूप- खूप शुभेच्छा!- सतीश व्यास, ज्येष्ठ संतूरवादक
२०१९ चा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार मला मिळाला होता. आज पुन्हा या कार्यक्रमात गायला मिळते, हा माझा सन्मान समजते. - आर्या आंबेकर, गायिका
सूर जोत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कारासाठी संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. ‘लोकमत’ने जो आदर-सन्मान दिला त्याचा आनंद आहे. हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय दिवस आहे.- हरगुन कौर, गायिका
‘लोकमत’ने सन्मान केला. त्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही. आता जबाबदारी वाढली आहे, त्या पुरस्काराला साजेशी कामगिरी माझ्याकडून व्हायला हवी.- प्रथमेश लघाटे, गायक