कांदिवली बनावट लसीकरण; आतापर्यंत ११ जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कांदिवली बनावट लसीकरणातील मास्टरमाइंड डॉ. मनीष त्रिपाठी याचा जामीन सोमवारी दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानुसार त्याने मंगळवारी कांदिवली पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
कांदिवली पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांनी त्रिपाठीने आत्मसमर्पण केल्याचे त्याचे वकील ॲड. आदिल खत्री यांनी सांगितले. या प्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली हाेती. डॉ. त्रिपाठीच्या अटकेनंतर हा आकडा आता ११ वर गेला आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस बारकाईने तपास करत आहेत.
कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेज सोसायटीमध्ये ३० मे, २०२१ रोजी हे बनावट लसीकरण करण्यात आले होते. डॉ. त्रिपाठीच्या अटकेमुळे आता या बनावट लसीकरणातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा होण्यास मदत होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अद्याप या प्रकरणी कांदिवलीसह बोरीवली, खार, वर्सोवा, बांगुरनगर, भोईवाड्यातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
....................................