माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत ११ लाख २८ हजार ६७ नागरीकांचे सर्व्हेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 05:29 PM2020-10-05T17:29:16+5:302020-10-05T17:30:46+5:30
ठाणे महापालिकेच्या वतीने सुमारे ५५० पथकांच्या माध्यमातून माझे कुटुंब माझे जबाबदारी अंतर्गत आतापर्यंत ११ लाख २८ हजार ६७ नागरीकांचे सर्व्हेक्षण पूर्ण केले असल्याची माहिती पुढे आली आहे. येत्या १० आॅक्टोबरपर्यंत ही मोहीम यशस्वी पूर्ण होईल अशी आशा पालिकेने व्यक्त केली आहे.
ठाणे : कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमअंतर्गत ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ोज ५५० पथकांच्या माध्यमातून आतापर्यंत ११ लाख २८ हजार ६७ नागरीकांच्या आरोग्याचे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यापैकी सात लाखाहून अधिक नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण हे गेल्या सहा दिवसात पुर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे या मोहीमेचा वेग वाढला असल्याचेच दिसत आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व मृत्यु दर कमी करण्यासाठी तसेच नागरिकांचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने माझे कुटूंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संपूर्ण राज्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये सुद्धा ही मोहिम १८ सप्टेंबरपासून राबविण्यात येत आहे. त्यासाठी तब्बल ५५० हून अधिक पथके तैनात करण्यात आली असून ही पथके घरोघरी जाऊन प्रत्येक कुटूंबांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करीत आहे. या मोहिमेत २८ सप्टेंबरपर्यंत शहरातील १ लाख ४० हजार ९३६ कुटूंबांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले होते. त्यात सुमारे ४ लाख २३ हजार ५९८ नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करण्यात आले होते. तर, आतापर्यंत ३ लाख ७३ हजार ४२७ कुटूंबाचे म्हणजेच ११ लाख २८ हजार ६७ नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण पुर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या सहा दिवसात या कामाचा वेग वाढला असून या कालावधीत २ लाख ३२ हजार ४९१ कुटूंबाचे म्हणजेच ७ लाख ४४ हजार ६९ नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले आहे. एकूण १८ सप्टेंबर पासून ते ०४ आॅक्टोबर या कालावधीत ११ लाख २८ हजार ६७ नागरीकांचे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले.