सर्वेक्षण हे तर विरोधकांचे षडयंत्र; खा. राहुल शेवाळेंचा कायदेशीर कारवाईचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 06:03 AM2023-08-20T06:03:11+5:302023-08-20T06:03:26+5:30
‘लोकमत’शी बोलताना खासदार शेवाळे यांनी व्यक्त केलं मत
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: माझ्या नावाने मतदारसंघातील नागरिकांना फोन करून सुरू असलेल्या सर्वेक्षणाशी माझा कोणताही संबंध नसून हे सर्वेक्षण म्हणजे विरोधकांचे षडयंत्र आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे.
शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये शनिवारी प्रकाशित झालेल्या वृत्ताबाबत ‘लोकमत’शी बोलताना शेवाळे म्हणाले की, माझ्या जनसंपर्क कार्यालयातून बोलत आहे, असा बनाव करून गेल्या काही दिवसांपासून माझ्या लोकसभा मतदारसंघात सुरू असलेले बोगस सर्वेक्षण हा विरोधकांचा डाव असून यातून विनाकारण संभ्रमाचे वातावरण तयार केले जात आहे. तसेच बोगस सर्वेक्षण करणारे लोक एकाच दिवसात एका व्यक्तीला सुमारे ८ ते १० वेळा फोन करत असल्याचे भयंकर प्रकारही माझ्या निदर्शनास आले आहेत. बोगस सर्वेक्षण करणाऱ्या लोकांविरोधात रीतसर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आम्ही विचार करत असून लोकांनी या गैरप्रकारांना बळी पडू नये, असे मी आवाहन करतो.