सीमा महांगडे मुंबई : कोणत्याही माध्यमातील शिक्षणासाठी, शिक्षक हा महत्त्वपूर्ण घटक ठरत असतो. खाजगी अनुदानित असो किंवा महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळा असोत तेथील शिक्षक कोणत्या घटकांचा, स्रोतांचा आणि आपल्या कौशल्यांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्यात हातभार लावतात हे पाहणे महत्त्वाचे ठरत असते. मराठी शाळांतील विद्यार्थी आणि पालकांसोबत तेथील शिक्षकांची परिस्थिती काय आहे? कोणत्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते आणि काय आवश्यक आहे? याचा आढावा घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ आणि मराठी अभ्यास केंद्राने घेण्याचे ठरविले; आणि मराठी शाळांच्या सर्वेक्षणात शिक्षक या महत्त्वाच्या घटकाचाही समावेश केला. विविध मराठी शाळांना दिलेल्या भेटीनंतर शिक्षकांविषयीची परिस्थिती आणि त्यांची मते मांडण्याच्या प्रयत्न या सर्वेक्षणातून करण्यात आला आहे.
सर्वेक्षण केलेल्या शाळांमध्ये प्रकर्षाने जाणवलेली महत्त्वाची बाब म्हणजे येथील महिला शिक्षकांचे प्रमाण. सर्वेक्षण केलेल्या मराठी शाळांमध्ये महिला शिक्षकांची एकूण संख्या ११६२ तर पुरुष शिक्षकांची संख्या ७८२ इतकी आढळून आली. याचा अर्थ उत्पन्नाचा स्रोत म्हणून किंवा आवड / करिअर निवड म्हणून अधिकाधिक महिला शिक्षकी पेशाकडे वळत असल्याची नोंद सर्वेक्षणात करण्यात आली आहे. शाळांचा पट कमी होऊ लागल्याने त्या-त्या मराठी शाळांतील शिक्षणावरही गंडांतर येण्याची भीती आहेच. यामुळे त्या शाळेतील शिक्षकांना त्या परिसरातील चाळीत, झोपडपट्टीत फिरून मुलांना शाळांत येण्याचे आवाहन करावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र अशी मुले दीड-दोन महिन्यांतच पुन्हा शाळा सोडून देत असल्याने ती गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याची भीती या शिक्षकांना वाटत असल्याच्या प्रतिक्रिया सर्वेक्षणादरम्यान संवेदनशील शिक्षकांनी नोंदविल्या आहेत.
पालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये २०१७-१८ च्या उपलब्ध माहितीनुसार, १९ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे गुणोत्तर होते. म्हणजेच मराठी माध्यमाच्या ४०५ शाळांमध्ये ५८ हजार ८६४ विद्यार्थ्यांसाठी ३ हजार ७० शिक्षक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि विशेष शिक्षक उपलब्ध होते. पालिका शाळांतील मराठी माध्यमाच्या शाळांचा दर्जा किंवा गुणवत्ता यासाठी शिक्षकांचे हे गुणोत्तर एक कारण असल्याचे अधोरेखित होते.
खाजगी मराठी किंवा पालिकेच्या मराठी माध्यमाच्या अनेक शाळांचे मूल्यमापन करताना अधिकारी वर्ग मुलांच्या सामाजिक, आर्थिक स्थितीचा विचार करीत नसल्याचे मत शिक्षकांनी नोंदविले तर अनेक विशेषत: पालिकेच्या मराठी माध्यमाच्या शिक्षकांनी शाळांत शासनाच्या चौकटीशिवाय कामे करीत राहावी लागत असल्याने इतर उपक्रम राबविता येत नसल्याची खंत व्यक्त केली.मराठी शाळांतील शिक्षकांच्या शिकविण्याच्या अडचणीप्रमाणे वैयक्तिक समस्याही या सर्वेक्षणात नोंदविण्यात आल्या आहेत. सर्वेक्षण केलेल्या मराठी शाळांपैकी ११२ शाळा या अनुदानित आहेत तर विनाअनुदानित शाळांची संख्या केवळ ७ आहे. शिक्षकांनाही आवश्यक सुविधा, वेतन आणि उपक्रम राबविण्याचे स्वातंत्र्य मिळणे आवश्यक आहे. वेतनाची समस्या कायमबहुतांश मराठी शाळा या खाजगी अनुदानित असल्याने बऱ्याचदा वेतनाच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांकडून देण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणच्या मराठी माध्यमाच्या शाळांत शाळाबाह्य मुलांना शोधून आणण्यासारखी आणखी शाळाबाह्य कामे करावी लागत असल्याचे स्पष्ट केले. यामुळे शिक्षक वर्गाला ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे़