मुंबई : घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगरमधील झोपड्यांच्या सर्वेक्षणाचे काम झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) पूर्ण केले आहे. त्यामुळे आता या झोपड्यांची पात्रता निश्चिती करून लवकरच याद्या जाहीर केल्या जाणार आहेत.
रमाबाई आंबेडकरनगर येथील ३३.१५ हेक्टर जागेचा विकास करून तेथील अंदाजे १६,५७५ झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि एसआरए यांच्या माध्यमातून हे पुनर्वसन केले जाणार आहे. एसआरएकडून या भागातील झोपड्यांच्या सर्वेक्षणाला १५ मार्चपासून सुरुवात करण्यात आली होती.
अतिरिक्त ५ हजार घरे उपलब्ध होणार-
दरम्यान, पूर्व मुक्त मार्गालगत असलेल्या १६९४ झोपड्यांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. या झोपड्यांच्या प्रारूप याद्या या आठवड्यात लावण्यात येतील, अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकल्पामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग विस्तार प्रकल्पाकरिता लागणारी जमीन एमएमआरडीएला विनामूल्य मिळणार आहे. तसेच या भागातील सुमारे २ हजार रहिवाशांचेही पुनर्वसन केले जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेमुळे एमएमआरडीएला अतिरिक्त ५ हजार घरे उपलब्ध होणार आहेत.
१) एसआरएने हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. यामध्ये रहिवाशांचे बायोमेट्रिक पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही काही रहिवाशांकडून कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नाही.
२) सुट्यांमुळे काही रहिवासी गावी गेले आहेत. त्यामुळे कागदपत्रे सादर करण्यासाठी विलंब होत आहेत. त्यामुळे या रहिवाशांना कागदपत्रे सादर करण्यासाठी एसआरएकडून मुदत देण्यात आली आहे.
३) पुढील महिनाभरात प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर एसआरएकडून पात्र रहिवाशांच्या याद्या जाहीर केल्या जाणार आहेत.