खार पोलीस करणार शाळकरी बसेसचे सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 06:34 AM2019-02-08T06:34:39+5:302019-02-08T06:35:08+5:30

खारमध्ये पोदार इंटरनॅशनल शाळेच्या बसमध्ये गीअर बदलण्यासाठी लाकडी ‘बांबू’ वापरून गाडी चालवण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला.

 Survey of School Buses by Khar Police | खार पोलीस करणार शाळकरी बसेसचे सर्वेक्षण

खार पोलीस करणार शाळकरी बसेसचे सर्वेक्षण

Next

मुंबई  -  खारमध्ये पोदार इंटरनॅशनल शाळेच्या बसमध्ये गीअर बदलण्यासाठी लाकडी ‘बांबू’ वापरून गाडी चालवण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याची संवेदनशीलता लक्षात घेत आता हद्दीतील सर्वच शाळांच्या बसचे सर्वेक्षण खार पोलीस करणार आहेत. तसेच स्थानिक शाळांच्या व्यवस्थापनालाही याबाबत सूचना देण्यात येतील.
शाळेच्या बसचा वापर विशेषत: लहान मुलांना ने-आण करण्यासाठी केला जातो. पोदार इंटरनॅशनल शाळेच्या बसमध्ये गीअरच्या तुटलेल्या लोखंडी दांड्याच्या जागी बांबू वापरल्याप्रकरणी राजकुमार (२२) नामक चालकाला अटक करण्यात आली आहे. गीअर तुटल्याने गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालत अशाच प्रकारे बांबूच्या आधाराने तो गाडी चालवत असल्याची धक्कादायक माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. या सर्व प्रकारामुळे पालक धास्तावले आहेत.
‘आम्ही या प्रकरणी संबंधित शाळेसोबत पत्रव्यवहार करत त्यांना काही निर्देश दिले आहेत,’ अशी माहिती खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. तसेच खार पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या सर्वच शाळांच्या बसेसचे सर्वेक्षण करण्यास सहकाºयांना सांगितल्याचे ते म्हणाले. शाळा प्रशासनाने तांत्रिक अडचणी असलेल्या गाड्यांची पाहणी करून त्याची वेळीच दुरुस्ती करून घ्यावी. तसेच अशी एखादी बस असल्यास ती चालवण्यास शाळेकडून परवानगी नाकारण्यात यावी, अशा अनेक महत्त्वाच्या सूचना अन्य शाळांनाही खार पोलिसांकडून दिल्या जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, भरधाव आणि निष्काळजीपणे गाडी चालविल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला बसचालक राजकुमार याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

नेमका प्रकार काय होता?

खार पश्चिमेत मंगळवारी पोदार इंटरनॅशनल शाळेच्या दिशेने बस नेताना एका व्यावसायिकाच्या कारला राजकुमारने धडक दिली. स्टेअरिंगमध्ये गडबड असल्याचे तो सांगत होता. व्यावसायिकाने बसमध्ये शिरत स्टेअरिंग तपासले. तेव्हा गीअर बदलण्याच्या तुटलेल्या दांड्याच्या जागी लावलेला बांबू त्यांच्या नजरेस पडला. त्यानंतर त्याला खार पोलिसांनी अटक केली.

‘... यापुढे आॅडिट करणार’
शाळा प्रशासन यासंदर्भात काही बोलण्यास तयार नाही. मात्र, त्यांनी एक निवेदन जाहीर केले असून त्यात त्यांनाही या प्रकाराने धक्का बसल्याचे म्हटले आहे. या संदर्भात शाळा वाहतूक समितीसोबत शाळा प्रशासन सर्व प्रकरणाची चौकशी करीत असल्याचे म्हटले आहे. घटना घडली तेव्हा बसमध्ये किती मुले होती, यासंदर्भात माहिती देण्यास शाळेने नकार दिला. मात्र, सर्व विद्यार्थी सुरिक्षत असल्याची माहिती निवेदनात आहे. याचसोबत पुढील काळात शाळेच्या सर्व बसेसचे आॅडिट केले जाईल आणि सर्व कंत्राटी बस चालकांना प्रशिक्षण देण्यात येईल असेही निवेदनात शाळा प्रशासनाने म्हटले आहे.

Web Title:  Survey of School Buses by Khar Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.