जिल्ह्यात जलस्रोतांचे सर्वेक्षण
By admin | Published: October 3, 2015 11:43 PM2015-10-03T23:43:22+5:302015-10-03T23:43:22+5:30
पिण्याचे पाणी, परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता यांचा आरोग्याशी थेट संबंध आहे. नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणे आवश्यक आहे.
अलिबाग : पिण्याचे पाणी, परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता यांचा आरोग्याशी थेट संबंध आहे. नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणे आवश्यक आहे. व्यक्तिगत सवयी व सार्वजनिक अस्वच्छता, नळ पाणीपुरवठा यंत्रणेतील दोष, देखभाल व दुरुस्ती याविषयी असलेल्या अनास्थेमुळे पाणी दूषित होते व असे दूषित पाणी पिण्यास वापरल्याने अनेक जलजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. यावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील पिण्याच्या जलस्रोतांची तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
जनतेला शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा होण्यासाठी पाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. त्याकरिता पावसाळ्यानंतरचे स्वच्छता सर्वेक्षण २ ते ३० आॅक्टोबर या कालावधीत करण्यात येणार असल्याची माहिती, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी दिली आहे.
जनतेला शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करणे व जलजन्य रोगांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत जिल्ह्यात पाणी व गुणवत्ता व सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. पाणी गुणवत्ता व सनियंत्रण कार्यक्रमांमध्ये स्वच्छता सर्वेक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सर्वेक्षण असून सर्वेक्षणाद्वारे ग्रामपंचायतींना लाल, हिरवे, पिवळे व चंदेरी कार्ड वितरित करण्यात येते. रायगड जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्राकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व गावांतील पिण्याच्या पाण्यांच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण (सॅनिटरी सर्व्हे) वर्षातून दोन वेळा करण्यात येते. हे सर्वेक्षण पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर जिल्ह्यात राबविले जाते. पावसाळ्यानंतरचे स्वच्छता सर्वेक्षण २ ते ३० आॅक्टोबर २०१५ या दरम्यान रायगड जिल्ह्यात राबविण्यात येणार असून स्वच्छता सर्वेक्षणातून स्रोताभोवतीचा परिसर, पाणीपुरवठा संरचना व व्यवस्थापनातील जे काही दोष आढळून येतात त्यांचे निराकरण करून संभाव्य साथीस प्रतिबंध करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी गुणवत्ता व सनियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित राहावेत यासाठी नियमित पाणी शुद्धीकरण व त्याबरोबर जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाणी नमुन्यांची तपासणी दरमहा केली जाते. या सर्वेक्षणामुळे जिल्ह्यांतील नागरिकांना पिण्याचे शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी अखेरीस सांगितले.