मुंबई : मालाड पूर्वेकडील शांताराम तलाव येथील मुंबई-अहमदाबाद पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ‘सबवे’ला तडा गेल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच प्रशासनासह लोकप्रतिनिधींची धावपळ उडाली. वृत्ताची दखल घेत एमएमआरडीए आणि भाजपाचे स्थानिक नगरसेवक विनोद मिश्रा, नगरसेविका दक्षा पटेल यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावर हे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, असे निर्देश लोकप्रतिनिधींनी एमएमआरडीएसह सार्वजनिक बांधकाम प्रशासनाला दिले. मात्र अद्यापही संबंधित प्रशासनाने येथील काम सुरू केलेले नाही.सबवेला मेट्रोच्या कामामुळे धक्के बसत आहेत. सबवेच्या खाली उभे राहिल्यावर सबवेवरून वाहने गेल्यावर सबवेचा काही भाग खाली कोसळतो. पश्चिम द्रुतगती महामार्गावरून दरदिवशी लाखो वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे दररोज थोडा थोडा भाग खाली पडून सबवेच्या आतील लोखंडी सळया दिसू लागल्या आहेत. याची त्वरित दखल घेतली गेली नाही, तर दुर्घटना घडण्याची भीती आहे.सबवेला तडा गेल्याचे ‘लोकमत’ने प्रभाग क्रमांक ४३चे स्थानिक नगरसेवक विनोद मिश्रा यांच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र अद्याप येथील कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही.बुधवारी काम केले जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले होते. मात्र कामाला सुरुवात झालेली नाही. पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवून लवकरच सबवेच्या कामाला सुरुवात केली जाईल.- दक्षा पटेल,स्थानिक नगरसेविकाप्रशासनाकडे तक्रार करून महिना उलटला. अद्यापही सबवेच्या कामाला सुरुवात झालेली नाही. लोकांचे जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का? प्रशासनाने त्वरित लक्ष घालून काम पूर्ण करावे.- प्रमोद जाधव, संस्थापक,विचारधारा साईराम फाउंडेशन
‘सबवे’ची पाहणी केली; काम कधी सुरू करणार? द्रुतगती महामार्गावरील मालाड सबवेच्या कामात दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 4:48 AM