मुंबई : कृषी विभागातील खाजगी, कंत्राटी, ठेकेदारी आणि दलाली पद्धत बंद करून वर्षातील बाराही महिने काम द्या, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य तांत्रिक कृषी कीडरोग सर्वेक्षक संघटनेने गुरुवारी आझाद मैदानात धरणे दिले. समान काम, समान वेतन कायद्यानुसार कीडरोग सर्वेक्षकांना पगारवाढ देण्याची मागणीही या वेळी संघटनेने केली.राज्यातील कीडरोग सर्वेक्षक आणि संगणक प्रचालक हे २००९ सालापासून सोयाबीन, कापूर, तूर, हरभरा, भात, आंबा (फळ) पिकांवरील कीडरोग सर्वेक्षण व संनियंत्रण प्रकल्पात काम करत आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीचे काम करणाऱ्या या सर्वेक्षकांचे ठेकेदारांकडून आर्थिक व शारीरिक शोषण केले जात असल्याचा संघटनेचा आरोप आहे. वर्षातील ६ ते ७ महिने या कर्मचाऱ्यांना राबवून घेतले जाते. मात्र उरलेले महिने काम नसल्याचे कारण देत घरी बसावे लागते. त्यामुळे गेल्या ८ वर्षांपासून काम करूनही संबंधित कर्मचाऱ्यांचे भवितव्य अधांतरिच आहे. परिणामी, शासनाने बारा महिने काम देऊन या प्रकल्पातील कंत्राटी पद्धत मोडून संबंधित कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याची मागणी संघटनेने केली आहे. (प्रतिनिधी)
सर्वेक्षकांचे आंदोलन
By admin | Published: March 25, 2017 1:49 AM