दैव बलवत्तर होते म्हणून वाचले, अन्यथा....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:06 AM2021-07-22T04:06:15+5:302021-07-22T04:06:15+5:30
मुंबई : शनिवार, रविवार आणि सोमवार असे सलग तीन दिवस मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढले. याच मुसळधार पावसामुळे मालाड, ...
मुंबई : शनिवार, रविवार आणि सोमवार असे सलग तीन दिवस मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढले. याच मुसळधार पावसामुळे मालाड, कुरार व्हिलेज, आंबेडकरनगरमधील शंभरांहून अधिक घरे पावसाच्या पाण्याच्या पूराखाली होती. पूरग्रस्त नागरिकांनी यंत्रणांची मदत मागितली. मात्र, कित्येक काळ उलटल्यानंतरही या नागरिकांच्या मदतीला कोणीच धावून आले नाही, अशी खंत संबंधितांनी व्यक्त केली आहे. बुधवारच्या मुसळधार पावसादरम्यान देखील येथील नागरिकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, कोणीच मदत करत नाही, असे येथील नागरिकांचे म्हणणे असून, येथील १३ हजार नागरिकांचे पुनर्वसन झाले तर भविष्यात संकट ओढवणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
घर बचाव, घर बनाव आंदोलनाचे बिलाल खान यांच्याकडील माहितीनुसार, येथील शंभर घरातील गरीब कुटुंबांनी मुसळधार पावसात रात्र जागून काढली आहे. येथील मुसळधार पावसाचा जोर वाढत असतानाच नागरिकांनी यंत्रणांकडे मदत मागितली. पण अखेर कोणीच मदतीला आले नाही. सरकारने तर यांच्याकडे केव्हाच दुर्लक्ष केले आहे. २०१९ साली येथे आलेल्या पुराने आणि कोसळलेल्या भिंतीने तब्बल ३१ नागरिकांचे जीव घेतले होते. मात्र, आजही परिस्थिती फार काही वेगळी नाही. पाणी, वीज आणि सांडपाणी वाहून नेण्याची किंवा तत्सम सुविधा आजही या नागरिकांना मिळालेल्या नाहीत. स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे कायम कानाडोळा करत आहेत. येथील रहिवाशांचे व्यवस्थित ठिकाणी पुनर्वसन व्हावे म्हणून कोणीच कार्यरत नाही.
शनिवारच्या पूरादरम्यान नागरिकांनी हेल्पलाईनवर फोन केले. अग्निशमन दलास मदत मागितली. महापालिकेकडे मदत मागितली. मात्र, मदत मिळालीच नाही. पूरादरम्यान येथील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवावे, असे एकाही यंत्रणेला वाटले नाही. दुर्घटना घडल्यानंतर आणि जीव गेल्यानंतर सगळे येथे येतील. मात्र तोवर वेळ गेली असेल, असेही बिलाल खान यांनी नमूद केले.
अजूनही वेळ गेलेली नाही
परिणामी अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे यंत्रणांनी पुढाकार घेत येथील नागरिकांच्या पुनर्वसनावर भर द्यावा, अशी मागणी जोर धरत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यात लक्ष घालावे, असा सूर स्थानिक नागरिकांमधून उमटत आहे.