म्हाडाच्या विरार-बोळींज प्रकल्पाला सूर्या देणार पाणी
By सचिन लुंगसे | Published: November 23, 2023 06:31 PM2023-11-23T18:31:25+5:302023-11-23T18:31:54+5:30
MHADA News: एमएमआरडीएच्या सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पातून म्हाडाच्या कोंकण मंडळाच्या विरार-बोळींज येथील गृहनिर्माण प्रकल्पाला पाणी पुरवठा सुरू झाला आहे.
मुंबई - एमएमआरडीएच्या सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पातून म्हाडाच्या कोंकण मंडळाच्या विरार-बोळींज येथील गृहनिर्माण प्रकल्पाला पाणी पुरवठा सुरू झाला आहे. यामुळे विरार-बोळींज येथील २२७७ घरांच्या सोडतीसाठी अर्ज करण्याकरिता अर्जदारांना प्रोत्साहन मिळणार आहे. शिवाय यापूर्वीच्या सोडतीत घरांचा ताबा घेतलेल्या २३८४ सदनिका धारकांनाही यामुळे दिलासा मिळाला असून आता २२७७ पैकी शेवटच्या घराची विक्री होईपर्यंत येथील घरांसाठी अर्ज सादर करणे व स्वीकृती प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.
विरार-बोळींज येथील प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य या योजने अंतर्गत २२७७ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अर्जदारांकरिता उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आली असून अर्जदाराने उत्पन्नाचा कुठलाही पुरावा सादर करणे गरजेचे नाही. अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे आधारकार्ड व पॅन कार्ड आवश्यक असून अर्जदार विवाहित असल्यास पती व पत्नी दोघांचे आधारकार्ड, पॅन कार्ड लागणार आहे. एक अर्जदार या प्रकल्पात एकापेक्षा अधिक घरासाठी अर्ज करू शकतात. या सर्व इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त असून अर्जदारांनी विक्री किंमत भरल्यावर दोन आठवड्यात ताबा दिला जाणार आहे.
अधिक माहितीसाठी ०२२ ६९४६८१०० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.
https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी व अर्ज भरावा.
अनामत रक्कम भरणा व परतावा सुविधेकरिता इंडियन बँकेच्या ७०६६०४७२१४ व ९५२९४८५७८० या हेल्पलाइन वर संपर्क साधावा.