वाट चुकलेल्या कोकराला पुन्हा जवळ घेतलं; पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करताना सूर्यकांता पाटील भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 12:46 PM2024-06-25T12:46:38+5:302024-06-25T12:47:00+5:30

राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपचं कमळ हाती घेतलेल्या सूर्यकांता पाटील यांनी दशकभरानंतर घरवापसी केली आहे.

Suryakanta Patil is emotional while returning to sharad Pawars NCP | वाट चुकलेल्या कोकराला पुन्हा जवळ घेतलं; पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करताना सूर्यकांता पाटील भावुक

वाट चुकलेल्या कोकराला पुन्हा जवळ घेतलं; पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करताना सूर्यकांता पाटील भावुक

Suryakanta Patil ( Marathi News ) : भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. २०१४ साली राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपचं कमळ हाती घेतलेल्या पाटील यांनी दशकभरानंतर घरवापसी केली आहे. जुन्या पक्षात पुन्हा प्रवेश करताना सूर्यकांता पाटील या काहीशा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. "मी रागामुळे पक्षातून बाहेर पडले होते. मात्र तिथं जाऊन मी १० वर्षांत काहीही केलं नाही. फक्त घरात बसून होते. कधीही कोणाला मत देण्याचं आवाहनही केलं नाही. तुम्ही वाट चुकलेल्या कोकराला पुन्हा जवळ घेतलं आहे. आता साहेब मला आदेश द्या. तुम्ही म्हणाल ते काम करायला मी तयार आहे," असं पाटील यांनी शरद पवार यांना उद्देशून म्हटलं आहे.

"साहेबांनी पुकारलेलं हे युद्ध ते जिंकणार आहेत, हे सांगायला माझ्यासारख्या व्यक्तीची आवश्कयता नाही. मात्र तुम्ही चालायला लागले की आमच्या पोटात खड्डे पडतात. कारण हे वय नाही. मात्र ज्या घरातील मुलं आमच्यासारखी पळून जातात, त्या घरातल्या बापाला शेवटपर्यंत कष्ट करावे लागतात. मात्र आता मी पुन्हा तुमच्यासोबत काम करायचं ठरवलं आहे. साहेब तुम्ही आणि जयंतराव सांगतील ते काम करेन. माझ्यासाठी कोणतंही काम छोटं किंवा मोठं नाही. मला पुन्हा पक्षात प्रवेश दिल्याबद्दल आभार," असं सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करताना म्हटलं आहे.

दरम्यान, सूर्यकांता पाटील या भाजपमध्ये हदगाव विधानसभा संयोजक म्हणून काम पाहत होत्या. मात्र नुकतंच त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहीत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह इतर पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर आता त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे.

सूर्यकांता पाटील यांचा राजकीय प्रवास

शरद पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्या म्हणून ओळख राहिलेल्या सूर्यकांता पाटील यांची कारकीर्द चढती राहिली आहे. नांदेड नगरपालिकेत नगरसेवक म्हणून आपल्या कामाची चुणूक दाखविल्यानंतर १९८० मध्ये हदगाव मतदारसंघातून निवडून येत  त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर १९८६ मध्ये काँग्रेसकडून त्या राज्यसभेवर गेल्या तर १९९१, १९९८ आणि २००४ असे तीन वेळा  त्या लोकसभेत पोहचल्या. केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री या पदाची धुराही त्यांनी सांभाळली. मात्र नंतरच्या काळात लोकसभा निवडणुकीवेळी हिंगोली मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तरीही विधान परिषदेवर वर्णी लागेल, अशी अपेक्षा होती. परंतु पक्षाने रामराव वडकुते या नव्या चेहऱ्याला मैदानात आणले. त्यानंतर सूर्यकांता पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर झाल्या. २०१४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता.

भाजपमधून राजीनामा देताना काय म्हणाल्या पाटील?

'मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा तथा माझ्या हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा देत आहे. आपल्या सोबत गेल्या १० वर्षात खूप काही शिकता आले. तालुक्यात बुथ कमिटीपर्यंत काम केले. आपण दिलेल्या संधीसाठी मी आपली व भारतीय जनता पार्टीची अत्यंत आभारी आहे. मी आपला निरोप घेत आहे. प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न केला. पण आपल्या व्यस्ततेमुळे ते शक्य झाले नाही. कोणतीही कटुता मनात न ठेवता राजीनामा देत आहे, तो स्वीकारावा ही नम्र विनंती' असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उद्देशून लिहिलेल्या राजीनामा पत्रात सूर्यकांता पाटील यांनी म्हटलं.
 

Web Title: Suryakanta Patil is emotional while returning to sharad Pawars NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.