महापालिकेच्या शाळांमध्ये सूर्यनमस्कार सुरूच राहणार

By Admin | Published: September 17, 2016 04:04 AM2016-09-17T04:04:26+5:302016-09-17T04:04:26+5:30

शरीरासाठी सूर्यनमस्कार चांगला व्यायाम आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेने शाळांमध्ये सूर्यनमस्कार बंधनकारक करण्याबाबत केलेल्या ठरावाला

Suryanamaskar will continue in municipal schools | महापालिकेच्या शाळांमध्ये सूर्यनमस्कार सुरूच राहणार

महापालिकेच्या शाळांमध्ये सूर्यनमस्कार सुरूच राहणार

googlenewsNext

मुंबई : शरीरासाठी सूर्यनमस्कार चांगला व्यायाम आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेने शाळांमध्ये सूर्यनमस्कार बंधनकारक करण्याबाबत केलेल्या ठरावाला अंतरिम स्थगिती देण्यास शुक्रवारी नकार दिला.
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार करून घेणे बंधनकारक करण्याबाबत मुंबई महापालिकेने २३ आॅगस्ट रोजी ठराव मंजूर केला. या ठरावाला सामाजिक कार्यकर्ते मसूद अन्सारी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. महापालिकेच्या या ठरावामुळे मूलभूत अधिकारांवर गदा येत आहे. त्यामुळे महापालिकेचा हा ठराव बेकायदा आहे, असे अन्सारी यांनी याचिकेत म्हटले आहे.
‘सूर्यनमस्कार’ या नावावर जाऊ नका. हा योगाचा प्रकार असून, तो शरीरासाठी चांगला असतो. केवळ नावावरून याला विरोध करू नका,’ असे निरीक्षण मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने नोंदविले. महापालिकेच्या शाळांमध्ये सर्व धर्मांतील, पंथांतील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांकडून सूर्यनमस्कार करून घेऊन महापालिका त्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणत आहे. सूर्यनमस्कारांमध्ये १२ आसनांचा समावेश आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांकडून सूर्यनमस्कार करून घेणे अयोग्य आहे. त्याशिवाय मुलांकडून मंत्रही उच्चारून घेतले जातात, असे याचिकेत म्हटले आहे.
त्यावर उच्च न्यायालयाने मंत्राबाबत व अल्पवयीन मुलांकडून सूर्यनमस्कार करून घेणे योग्य की अयोग्य आहे, याबाबत सुनावणीत निर्णय घेऊ, असे म्हणत महापालिकेच्या ठरावावर अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला. या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांनंतर ठेवण्यात आली आहे.
भाजपाच्या नगरसेविका स्मिता कांबळे यांनी महापािलकेच्या १२०० शाळांमध्ये सूर्यनमस्कार बंधनकारक करण्याबाबत महापालिकेपुढे प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव महापालिकेने मंजूर केला. मात्र या प्रस्तावास काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोध करण्यात आला. तर भाजपाने या उपक्रमास राजकीय किंवा धर्माचा रंग देऊ नये, असे विरोधकांना बजावले होते.

Web Title: Suryanamaskar will continue in municipal schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.