Join us  

सूर्योदय फाऊंडेशन करणार  महानगरपालिका शाळांमधील मुलांची मोफत श्रवण तपासणी

By मनोहर कुंभेजकर | Published: May 05, 2023 5:27 PM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 9 मे रोजी होणार या उपक्रमाचा शुभारंभ

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सूर्योदय फाऊंडेशनने त्यांच्या सामाजिक कार्याअंतर्गत 'द गिफ्ट ऑफ साउंड' नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे ज्यामध्ये ते शालेय मुलांच्या श्रवण क्षमतेची चाचणी घेत आहेत. मुंबई व महाराष्ट्रातील सर्व महापालिका  शाळांपासून ते देशभरातील सर्व महापालिका शाळांमध्ये नेण्याची त्यांची योजना आहे. मुंबईच्या शाळांशी घनिष्ठ संबंध निर्माण करणाऱ्या परिसर, आशा सारख्या स्वयंसेवी संस्थांसोबत, सूर्योदय फाऊंडेशनने शहरातील अनेक मुंबई महानगरपालिका संचालित शाळांमधील शेकडो शाळकरी मुलांची श्रवण तपासणी केलेली आहे. या उपक्रमाची सुरुवात गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्या संकल्पनेतून झाली आहे.

 दि,9 मे रोजी अरुण पौडवाल यांच्या वाढदिवसानिमित्त,  'द गिफ्ट ऑफ साउंड' उपक्रमाचे अनावरण होणार असून, ज्याअंतर्गत महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या श्रवण क्षमतेची चाचणी घेतली जाईल आणि आवश्यक असेल तेथे या मुलांना श्रवणयंत्र दिले जातील. या उपक्रमाचे उद्घाटन मंगळवार दि,9 मे  रोजी सकाळी 9.30 वाजता रंगशारदा सभागृह, वांद्रे पश्चिम येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.  या उपक्रमाला भारतीय चित्रपट उद्योगातून चांगला पाठिंबा मिळत आहे अशी माहिती अनुराधा पौडवाल यांनी दिली.

सूर्योदय फाउंडेशनची स्थापना 2017 मध्ये झाली होती.आणि तेव्हापासून या संस्थेने अनेक सामाजिक हितसंबंधित उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.दि,3 मार्च हा दिवस जागतिक श्रवण दिवस म्हणूनही ओळखला जातो.  सूर्योदय फाऊंडेशनने ओडिशातील कर्णबधिर शाळकरी मुलांसाठी 250 श्रवणयंत्र दान केले होते, ज्याचे उद्घाटन ओडिशाचे राज्यपाल, प्रो. गणेशी लाल यांच्या हस्ते करण्यात आले होते.

टॅग्स :मुंबई