सुशांत, अंकिताचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 12:56 AM2020-08-06T00:56:31+5:302020-08-06T00:57:00+5:30

ईडीकडून अधिक तपास सुरू

Sushant, Ankita's WhatsApp chat in possession | सुशांत, अंकिताचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट ताब्यात 

सुशांत, अंकिताचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट ताब्यात 

Next

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि माजी प्रेयसी अंकिता लोखंडे यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट ताब्यात घेतले आहेत. त्यानुसार अधिक तपास सुरू आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंद करीत अधिक तपास सुरू केला आहे. सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढल्याच्या आरोपावरून ईडी तपास करीत आहे. यात नुकताच सुशांतचे सीए संदीप श्रीधर यांचा जबाब नोंद केला आहे. त्यापाठोपाठ बुधवारी सुशांतसिंह राजपूत आणि त्याची  माजी प्रेयसी अंकिता लोखंडे यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅटही तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. यापूर्वी मुंबई पोलिसांनी अंकिताचा जबाब नोंद केला आहे. तसेच बिहार पोलिसांनीही तिच्याकडे चौकशी केली. तिने रियामुळे सुशांत तणावात होता, असे पोलिसांना सांगितले आहे.

बिहार पोलिसांनी उपस्थित केले प्रश्न
बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीत सुशांतच्या बँक खात्यात गेल्या चार वर्षांत ५० कोटी रुपये जमा झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे ते सर्व पैसे काढून घेण्यात आले होते. इतकेच नव्हेतर, त्याच्या खात्यात एका वर्षात तब्बल १७ कोटी जमा झाले; त्यापैकी १५ कोटी काढण्यात आले. हा तपास करणे महत्त्वाचा होता. त्यामुळे अशा घटनांचा तपास का केला नाही? याबाबतही आम्ही मुंबई पोलिसांना प्रश्न विचारू, असेही बिहार पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सॅम्युअल मिरांडाची ईडीकडून चौकशी 
ईडीने रिया चक्रवर्तीचा मित्र सॅम्युअल मिरांडाकडे चौकशी सुरू केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सुशांतचे मेहुणे आयपीएस ओ.पी. सिंह यांनी फेब्रुवारीमध्ये परिमंडळ ९ चे तत्कालीन पोलीस उपायुक्त परमजीत दहिया यांच्याकडे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे केलेल्या संदेशात रिया चक्रवर्तीसह तिचा मित्र सॅम्युअल मिरांडा आणि मॅनेजर श्रुतीकडे चौकशी करण्यास सांगितले होते. त्यांच्यापासून सुशांतला धोका असल्याचे नमूद केले होते. मात्र लेखी तक्रारीशिवाय कारवाई करणे उचित नसल्याने पोलिसांनी लेखी तक्रार देण्यास सांगितले होते.

काही दिवसांपूर्वीच यांच्यातील हा संवादही व्हायरल करण्यात आला. अशात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने मिरांडाकडे चौकशी सुरू केली आहे. त्यानुसार त्याचा जबाब नोंद करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. त्याच्या बँक खात्याचाही तपशील घेण्यात येत आहे.
सॅम्युअल सुशांतच्या घरी काम करायचा. तसेच बिहार पोलिसांच्या दाखल गुन्ह्यात तोही आरोपी आहे. सुशांतच्या नावाने घेतलेल्या
सिम कार्डपैकी एक सिम कार्ड सॅम्युअलही वापरत होता. तसेच रियानेही त्याच्या नावाने सिम कार्ड घेतल्याचे समजते. 

Web Title: Sushant, Ankita's WhatsApp chat in possession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.