सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येचे प्रकरण अद्यापही सुटता सुटत नाहीये. त्यामुळे सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण राजकारणाचा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे मुखपत्र सामनामध्ये अनेक आरोप केले आहेत. बिहार पोलीस आणि केंद्राने महाराष्ट्र सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे हे भाजपाचे नेते आहेत आणि 2009मध्ये त्यांच्यावर आरोप लावण्यात आले होते, असा आरोपही त्यांनी केला आहे.सुशांत सिंग राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक ‘एफआयआर’ दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. त्याच वेळी दुसऱ्या राज्याचा काहीच संबंध नसताना त्यांनी समांतर तपास सुरू करावा हा मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास आहे' असं म्हणत संजय राऊत यांनी बिहार पोलिसांवर निशाणा साधला आहे.मुंबई पोलिसांनी हा तपास नको तितका जास्त खेचला. सिनेसृष्टीतील सेलिब्रिटीजना रोज चौकशीला बोलवायचे व ‘गॉसिप’ला वाव द्यायचा. या प्रकरणाचा वापर सिनेसृष्टीत दहशत निर्माण करण्यासाठी झाला काय ते पाहायला हवे, असं संजय राऊत यांनी सांगितले. सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे वेगळे का झाले? याचा तपास का झाला नाही? मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास नको तितका का खेचला? हे प्रकरण हाय प्रोफाईल होत असल्याचं दिसताच पोलिसांनी माध्यमांना त्याबाबत दिवसाआड माहिती का दिली नाही, असा सवाल करत संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांनाही धारेवर धरले आहे.गोध्रा दंगल, त्या निमित्ताने झालेल्या हत्यांचा तपास सीबीआयकडे जाऊ नये, कारण सीबीआय म्हणजे केंद्रीय सत्ताधाऱ्यांचे राजकीय हत्यार असल्याचे मत तेव्हा मोदी-शहांचे होते. हेच मत सुशांत सिंग राजपूत प्रकरणात व्यक्त झाले तर काय चुकले?' असा सवाल करत राऊतांनी भाजपाला सणसणीत टोला लगावला. तसेच सुशांतच्या मृत्यूआधी दिनो मोरिया या अभिनेत्याच्या घरी एक पार्टी झाली. या पार्टीभोवती रहस्य निर्माण करून त्याचा संबंध सुशांतच्या मृत्यूशी जोडला गेला, असं संजय राऊत यांनी सांगितले.
सुशांतचे कुटुंबीयांशी चांगले संबंध नव्हते, संजय राऊत यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 7:00 PM