Join us

सुशांत प्रकरणाचा ‘दाभोलकर’ होऊ नये, शरद पवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 3:46 AM

सुशांतसिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस उत्तमरित्या करत असल्याचे सांगत सीबीआयकडे हे प्रकरण सुपूर्द करण्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोध दर्शविला होता.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येच्या तपासात राज्य सरकार ‘सीबीआय’ला पूर्ण सहकार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच या तपासाची परिणती डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या तपासाप्रमाणे होऊ नये, असा टोला राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी लगावला आहे.सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह आत्महत्येचा तपास सीबीआय करेल, असा निर्णय दिल्यानंतर खा. पवार यांनी त्यावर टिष्ट्वटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. सुशांतसिंह प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस उत्तमरित्या करत असल्याचे सांगत सीबीआयकडे हे प्रकरण सुपूर्द करण्यास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोध दर्शविला होता.खा. पवार यांनी म्हटले आहे की, ‘सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की, महाराष्टÑ सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल. मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय मार्फत २०१४ मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.मंत्र्यांच्या भेटीचे वेळापत्रकदरम्यान, राष्टÑवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी पक्षाच्या कार्यालयात एक दिवस उपस्थित राहून कार्यकर्त्यांना भेट द्यावी, असे आदेश खा. पवार यांनी दिले. त्यानुसार वेळापत्रक तयार करण्यात आले असून सोमवारी जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक, मंगळवारी छगन भुजबळ, राजेंद्र शिंगणे बाळासाहेब पाटील, बुधवारी अजित पवार, राजेश टोपे, दत्ता भरणे, प्राजक्त तनपुरे, गुरुवारी हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील तर शुक्रवारी अनिल देशमुख, आदिती तटकरे, आणि संजय बनसोडे कार्यकर्त्यांना भेटतील. त्यांच्या वेळा देखील ठरवून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक मंत्र्याने दोन तास वेळ द्यावा असे त्यांना सांगण्यात आले आहे.>शरद पवार यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आदरांजली वाहताना त्यांचे विज्ञाननिष्ठ विचार, अंधश्रद्धेवर ओढलेला आसूड याचेही स्मरण केले.

टॅग्स :शरद पवार