मुंबई - सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपला बिहार निवडणुक लढवायची होती म्हणून सीबीआयला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले होते, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, जर सुशांतसिंगने आत्महत्या केली नाही, मग त्याचा खूनी कोण? असा सवालही राष्ट्रवादीने विचारला आहे.
सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असतानाच राजकीय कारणामुळे या प्रकरणाचा गुन्हा बिहार सरकारने दाखल केला व ही केस सीबीआयकडे दिली होती. परंतु, निष्पन्न काय झालं असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
एक वर्षानंतर सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास झालेला नाही त्यामुळे त्याची आत्महत्या नव्हती तर त्याचा हत्यारा कोण? हे सीबीआयने जनतेला सांगितले पाहिजे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.