सुशांतला फोन गेलाच नाही, मालवणी पोलिसांनी केले स्पष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 01:30 AM2020-06-24T01:30:23+5:302020-06-24T01:30:42+5:30
आम्ही त्याला फोन केला नसल्याचे मालवणी पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
गौरी टेंबकर-कलगुटकर
मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत (३४) याला त्याची माजी बिझनेस मॅनेजर दिशा सालीयन (२८) हिच्या मृत्यूप्रकरणी मालवणी पोलिसांकडून चौकशीसाठी फोन गेल्याची चर्चा होती. मात्र आम्ही त्याला फोन केला नसल्याचे मालवणी पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
सालीयन हिचा ९ जून, २०२० रोजी बाराव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली, तो अपघात होता, की तिला कोणी ढकलले याबाबत कोणतीच ठोस माहिती पोलिसांकडे नाही. मात्र तिच्या अचानक जाण्याने सुशांतला बसलेला मानसिक धक्काही त्याच्या तणावाचे कारण असू शकतो असे बोलले जातेय. सालीयन हिच्या मृत्यूनंतर ती अभिनेता सुशांत याची माजी मॅनेजर असल्याचे पोलिसांना समजल्यावर त्यांनी सुशांतला फोन केल्याचे त्याच्या मोबाइल क्रमांकाच्या सीडीआरमधून उघड झाले. तसेच त्याला तपासासाठी समन्स पाठविले जाणार होते, मात्र त्यापूर्वीच सालीयनच्या पालकांनी तिच्या मृत्यूबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे त्याला चौकशीसाठी बोलावले गेले नाही, अशीही चर्चा सध्या रंगली आहे. मात्र मालवणी पोलिसांकडून सुशांतला फोनच केला गेला नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आम्ही सलीयनच्या मृत्यूप्रकरणी सर्व संबंधितांकडे चौकशी केली. तसेच सालीयनचे सीडीआरही काढले. मात्र आम्ही सुशांतला चौकशी किंवा जबाब नोंदविण्यासाठी फोन केला नाही. तसेच त्याला समन्सही बजावण्यात येणार नव्हते, अशी माहिती मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कालपाड यांनी सांगितले. तसेच चौकशीसाठी जरी आम्ही त्याला फोन केला असता तर त्यात काही गैरही नाही, कारण तपासाच्या अनुषंगाने तो आमचा अधिकार आहे. मात्र सध्या विनाकारण सुशांत आणि दिशा प्रकरणात ‘कनेक्शन’ जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचीही खंत अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.
>सुशांत तणावात असल्याने त्यातच त्याने स्वत:ला संपविल्याचा अंदाज अद्याप तपास यंत्रणांकडून वर्तविला जात आहे. मात्र याच्या आत्महत्येला आता आठवडा उलटूनही तणावामागचे कारण शोधण्यात त्यांना यश मिळालेले नाही. त्यामुळे सर्व बाजूने याचा तपास पोलीस सध्या करत आहेत.सालीयन हिचा ९ जून, २०२० रोजी बाराव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली, तो अपघात होता, की तिला कोणी ढकलले याबाबत कोणतीच ठोस माहिती पोलिसांकडे नाही.