सुशांतसिंह प्रकरण: चौकशीला ४ महिने झाले, काय हाती लागलं सांगा?; अनिल देशमुखांचा सीबीआयला सवाल
By मोरेश्वर येरम | Published: December 27, 2020 03:31 PM2020-12-27T15:31:43+5:302020-12-27T15:33:31+5:30
बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह १४ जून २०१९ रोजी त्याच्या राहत्याघरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता.
मुंबई
बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवून जवळपास ४ महिने झाले आहेत. सीबीआयच्या हाती काय लागलं हे त्यांनी सांगावं, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे.
बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह १४ जून २०१९ रोजी त्याच्या राहत्याघरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशभरात मोठी खळबळ उडाली होती. सुशांतचा मृत्यूमागे संशय देखील व्यक्त करण्यात आला आणि मुंबई पोलिसांच्या तपासावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले होते.
सुशांतचे प्रकरण सीबीआयकडे सोपवून आता चार महिन्यांहून अधिक काळ झालेला आहे. अद्याप सीबीआयच्या हातात काहीच लागलेलं नाही. यावरुनच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
"सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवून जवळपास ४ महिने झाले आहेत. मात्र सीबीआयने अजूनही सुशांतसिंहची आत्महत्या होती की हत्या? याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही. नागरिकांना या प्रकरणाबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे सीबीआयने या तपासाबाबत लवकरात लवकर खुलासा करावा अशी मी विनंती करतो", असा खोचक टोला अनिल देशमुख यांनी लगावला आहे.
सुशांतसिंग प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवून जवळपास ४ महिने झाले. मात्र CBI ने अजूनही सुशांतसिंगची आत्महत्या होती की हत्या याबाबत स्पष्टीकरण दिलेलं नाही. नागरिकांना या प्रकरणाबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे CBI ने या तपासाबाबत लवकरात लवकर खुलासा करावा,अशी मी विनंती करतो. pic.twitter.com/KvWmVprJfM
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) December 27, 2020
सुशांत प्रकरणामुळे अनेक गौप्यस्फोट अन् मोहिम
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड माफिया, घराणेशाही आणि ड्रग्ज प्रकरणाचे मुद्दे चर्चेत आले. ड्रग्ज प्रकरणी तर नार्कोटिक्स ब्युरोने अनेक बड्या सेलिब्रिटींची चौकशी केली. दुसरीकडे घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन सोशल मीडियावर बॉलिवूडमधील बडे सेलिब्रिटी, दिग्दर्शक आणि निर्मात्यांना लक्ष्य केलं गेलं. घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन तर सोशल मीडियावर स्टारकिड्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटींवर बंदी घालण्याची मोहीम देखील राबवली गेली.