मुंबई - पर्यावरणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांना व्हॉट्असअद्वारे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या युवकास पोलिसांनी अटक केली आहे. जयसिंग राजपूत असं या युवकाचं नाव असून तो सुशांतसिंग राजपूतचा जबरा फॅन आहे. बंगळुरूच्या पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी 34 वर्षीय आरोपीला जेरबंद केलं. अभिनेता सुशांतसिंगच्या मृत्युमुळे या आरोपीला अतिशय दु:ख झाल्याने त्याने हे कृत्य केल्याचं प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.
आरोपी जयसिंग राजपूतने 8 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 च्या सुमारास आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवला होता. त्यामध्ये, सुशांतसिंगच्या मृत्यूबाबत आरोप करण्यात आले होते. त्यानंतर त्याने आदित्य ठाकरेंना तीन फोनही केले. तसेच, फोनवरुन मेसजद्वारे जीवे मारण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावतीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांच्या सायबर पथकाने तपास यंत्रणा कामाला लावली. बंगळुरू पोलीस पथकाने 18 डिसेंबर रोजी आरोपीला अटक केल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.
मुंबईच्या सायबर सेल पथकाने आरोपीच्या मोबाईल नंबरवरुन त्याचा शोध घेतला असतो तो बंगळुरू येथे असल्याचं समजले. त्यानंतर, मुंबई पोलिसांनी बंगळुरू येथे जाऊन आरोपी जयसिंग राजपूत यास अटक केली आहे. याप्रकरणी, आरोपीविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.