- जमीर काझीमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्याचे एम्सच्या अहवालात शिक्कामोर्तब झाले असताना त्याची आर्थिक संपत्ती अभिनेत्री रियाने लुबाडल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तपासातून स्पष्ट झाले आहे. सुशांतच्या खात्यावरून रिया व तिच्या कुटुंबीयांशी व्यवहार झाला नसल्याने त्यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा खटला चालवू शकत नाही, या निष्कर्षाप्रत अधिकारी पोहचले आहेत.सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रिया, तिचे कुटुंबीय आणि सुशांतचे सीए व मॅनेजर यांनी कारस्थान करून त्याचे १५ कोटी हडप केल्याची तक्रार पटना पोलिसांकडे दिली होती. हा तपास सीबीआयकडे वर्ग केल्यानंतर ईडीनेही जुलैअखेरीस त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सुरुवातीला सीए श्रुती मोदी, मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि त्यानंतर शोविक, रिया व तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांची स्वतंत्रपणे कसून चौकशी केली. सुशांतसह या सर्वांचे बँक अकाउंट, कॅश, डेबिट कार्ड, आॅनलाइन बँकिंग आदी सर्व व्यवहार, त्यांचा गेल्या तीन वर्षांतील आयकर परतावा (आयटीआर) तपासला.इंद्रजीत चक्रवर्ती यांनी कॅनरा बँकेच्या वाकोल्यातील शाखेत ठेवलेले लॉकर अधिकाऱ्यांनी उघडून पडताळले. मात्र शेकडो तासांची चौकशी, बँक व्यवहाराची पडताळणी केल्यानंतरही काहीच आक्षेपार्ह सापडले नाही. त्यामुळे हा खटला चालवू शकत नसल्याबद्दल अधिकाºयाचे मत बनल्याचे समजते.दरम्यान, ईडीने रियाचे मोबाइल चॅट तपासल्यानंतर ड्रग्ज कनेक्शन उघड झाल्याने या प्रकरणी रिया व इतरांविरुद्ध एनसीबीकडे गुन्हा दाखल झाला. त्यामध्येही मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आलेले नाही, त्यामुळे त्यांचा तपास ईडी घेऊ शकत नाही.शॉपिंगवर खर्चही कमीचसुशांत, रियाच्या युरोप ट्रिप व काही शॉपिंगचा खर्च सुशांतच्या खात्यावरून झाला आहे. मात्र ही रक्कम फार मोठी नाही. सुशांत व रिया ‘लिव्ह इन’मध्ये राहत असल्याने तो आक्षेपार्ह म्हणता येत नसल्याचे ईडीचे मत आहे.
Sushant Singh Rajput Case: रियाविरुद्ध ईडीकडे नाही एकही सबळ पुरावा; लवकरच मिळणार दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 6:03 AM