Sushant Singh Rajput Case: अखेर रियाला जामीन; मात्र भाऊ शोविकला दिलासा नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 07:13 AM2020-10-08T07:13:11+5:302020-10-08T07:27:12+5:30
Sushant Singh Rajput Case: ड्रग्ज विक्रेत्याशी संबंध नाही - हायकोर्ट
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या रिया चक्रवर्तीची अखेर बुधवारी हायकोर्टाने जामिनावर सुटका केली. सुशांतचा मदतनीस दीपेश सावंत व मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांचाही जामीन न्या. सारंग कोतवाल यांनी मंजूर केला. रियाचा भाऊ शोविकसह अब्देल बसित परिहार याचा जामीन फेटाळला. आता सुप्रीम कोर्टात जावे लागेल, असे एनसीबीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग म्हणाले.
परवानगीशिवाय मुंबई सोडून जाऊ नये
न्यायालयाने रिया, सॅम्युअल, दीपेशला पोलिसांकडे पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले. देश सोडून जायचे असल्यास न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल. एनसीबीची परवानगी घेतल्याशिवाय मुंबई सोडून जाऊ नये, असाही आदेश कोर्टाने दिला.
उच्च न्यायालयाची निरीक्षणे
रियाची गुहेगारी पार्श्वभूमी नाही. तरुणांपुढे उदाहरण ठेवण्यास सेलिब्रिटी व आदर्श असलेल्या व्यक्तींना कठोर शिक्षा देणे मान्य नाही. सर्व समान आहेत.
रिया ड्रग्ज विक्रेत्यांमधील एक भाग नाही. तिने विकत घेतलेले ड्रग्ज अन्य तिसऱ्या व्यक्तीला आर्थिक फायद्यासाठी विकले नाहीत.
ती जामिनावर सुटल्यावर गुन्हा करणार नाही, यावर विश्वास ठेवू शकतो.
एनडीपीएस कायद्याच्या कलम २७ (ए), २४, १९ अंतर्गत ती दोषी नसल्याचे दिसते.
रियाची एक लाख रुपये तर अन्य दोघांची प्रत्येकी ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली.