नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर अनेकांनी बॉलिवूडच्या गटबाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, चाहत्यांनीही सोशल मीडियात अनेकांना ट्रोल केले, आता या प्रकरणात लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि चिराग पासवान यांच्यात ४-५ मिनिटे चर्चा झाली.
सुशांत सिंग राजपूतच्या अशा अचानक एक्झिटमुळे अनेकांना धक्का बसला, गेल्या काही महिन्यापासून सुशांत डिप्रेशनमध्ये होता आणि त्यातूनच सुशांतने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, आता सुशांतच्या मृत्यूचा तपास आणि डिप्रेशनची कारण काय याचा तपास मुंबई पोलिसांकडून केला जात आहे. सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करावी अशी मागणीही नेटीझन्सकडून करण्यात आली होती.
सुशांत सिंग राजपूत यांच्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिराग पासवान यांच्याशी बोलले की, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे, या प्रकरणात कोणी दोषी आढळलं तर त्यांना सोडणार नाही असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं. बिहारमध्ये सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमधील गटबाजीविरोधात प्रचंड आक्रोश आहे असं चिराग यांनी सांगितले, मुख्यमंत्र्यांनी फोनवरील चर्चेदरम्यान याबाबत सर्व प्रकारची मदत करण्याचंही आश्वासन चिराग यांना दिलं आहे.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात चिराग पासवान यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा झाल्यानंतर त्यांना पत्रही पाठवलं आहे. सुशांत सिंग राजपूतने पवित्रा रिश्ता नावाच्या सिरीअलमधून प्रकाशझोतात आला होता, तेव्हापासून त्याने चित्रपट सृष्टीत मागे वळून पाहिलं नाही. पवित्रा रिश्ता यात साकारलेल्या प्रमुख भुमिकेमुळे सुशांतचे अनेक चाहते निर्माण झाले. झलक दिखला जासारख्या रिएलिटी शोमध्येही त्यांनी कतृत्व सिद्ध केले. त्यानंतर बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात काम केले. मी गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे, सुशांतच्या आत्महत्येला बॉलिवूडमधील गटबाजी जबाबदार असल्याचं सगळ्यांचा आरोप आहे असं चिराग पासवान म्हणाले. १४ जून रोजी सुशांत सिंग राजपूतने बांद्रा येथील त्याच्या राहत्या घरात पंख्याला लटकून आत्महत्या केली होती, त्यानंतर अनेकांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीवर आरोप लावला होता.