Sushant Singh Rajput Death Case: रियाच्या कॉल कनेक्शनचा मुंबईल्या सरकारी कर्मचाऱ्याला मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 05:59 AM2020-08-12T05:59:08+5:302020-08-12T06:01:26+5:30
एका क्रमांकाच्या घोळाने दोनशेहून अधिक क्रमांक करावे लागले ब्लॉक
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील तपासाचा मुंबईतील सरकारी कर्मचाऱ्याला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यात रिया चक्रवर्ती आणि त्याच्या मोबाइल क्रमांकातील केवळ एका अंकाच्या घोळामुळे त्याला दिवसाला शेकडो कॉलसह संदेशात रिया कुठे आहे, याबाबत विचारले जात आहे. अहो, ‘तो मी नव्हेच’ सांगूनही कॉल सुरू असल्याने त्याला मोबाइल बंद करण्याची वेळ आली आहे.
काही दिवसांपूर्वी टीव्ही स्क्रीनवर रियाचे कॉल कनेक्शन म्हणून नंबर दाखवण्यात आला. या नंबरशी साधर्म्य असलेला केवळ एक अंक बदल असलेला नंबर नवी मुंबईतील सागर सुर्वे नावाच्या तरुणाचा आहे. मूळचा कोल्हापूरचा रहिवासी असलेला सागर मुंबईत सरकारी कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत आहे.
गेल्या आठवडाभरापासून त्याला दिवसाला शेकडो कॉल सुरू झाले. कॉल घेतले नाही तर संदेश, व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल संदेशाची भर पडत आहे. आतापर्यंत त्याने दोनशे क्रमांक ब्लॉक केले. पर्यायी नंबरही फ्लाइट मोडवर टाकला आहे. मात्र तरीही व्हॉट्सअॅपवरून संदेश सुरू असल्याने त्याने तेही डिलीट केले.
यात सगळे जण त्याला रिया कुठे आहे? तिच्याशी बोलायचे आहे, असे प्रश्न करत आहेत. काही जण शिव्याही घालत आहेत. अनेकांची उत्तरे देताना कामावरही परिणाम झाल्याचे तो सांगतो. आता मोबाइल बंद करण्याची वेळ आल्याचे सागरचे म्हणणे आहे. सरकारी कर्मचारी असल्याने अनेकांकडे त्याचा क्रमांक आहे. त्याचाही त्याला फटका बसत आहे.