Sushant Singh Rajput Death Case: सीबीआय कामाला लागली; एका अज्ञात व्यक्तीला घेऊन चौकशीसाठी गेस्ट हाऊसवर पोहोचली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 11:26 AM2020-08-21T11:26:06+5:302020-08-21T11:29:06+5:30
Sushant Singh Rajput Death Case: सुशांतचा कूक नीरज आणि मित्र संदीप सिंहचीदेखील चौकशी होणार
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू नेमका कसा झाला, याचा तपास करण्यासाठी सीबीआयची टीम मुंबईला पोहोचली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयनं पाच टीम तयार केल्या आहेत. त्यातील एक टीम वांद्रे पोलीस ठाण्यात पोहोचली आहे. सीबीआयचे अधिकारी डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्याकडून प्रकरणाशी संबंधित कागदपत्रं घेणार आहेत. त्यानंतर सीबीआय त्यांच्या पद्धतीनं तपास सुरू करेल.
मुंबईत दाखल झालेले सीबीआयचे अधिकारी सध्या गेस्ट हाऊसवर आहेत. या गेस्ट हाऊसवर सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी संबंध असलेल्या एका अज्ञात व्यक्तीला आणण्यात आलं आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी सुरू आहे. मात्र ही व्यक्ती नेमकी कोण याची माहिती उपलब्ध झालेली नाही. सीबीआयनं सुशांतचा कूक नीरजशीदेखील संपर्क साधला आहे. त्याचा जबाबदेखील नोंदवला जाणार आहे.
#WATCH Mumbai: CBI team brings an unidentified person related to #SushantSinghRajput case, to the guesthouse where they are staying, for questioning. pic.twitter.com/sumv7kCpak
— ANI (@ANI) August 21, 2020
सीबीआय सर्वात आधी नीरजचा जबाब नोंदवणार आहे. त्याची चौकशी करण्याचं ठिकाण गुप्त ठेवण्यात आलं आहे. सुशांतच्या मृत्यूवेळी नीरज घरात उपस्थित होता. त्यामुळेच नीरजचा जबाब संपूर्ण प्रकरणात अतिशय महत्त्वाचा असणार आहे. 'सुशांतनं माझ्याकडे १ ग्लास पाणी मागितलं होतं. सुशांत कधीही त्याच्या खोलीचा दरवाजा बंद करायचा नाही,' अशी माहिती नीरजनं याआधी माध्यमांना दिली आहे.
या प्रकरणात सीबीआय सुशांतचा कथित मित्र संदीप सिंहचीदेखील चौकशी करणार आहे. संदीप सिंहनं दोन वृत्तवाहिन्यांना मुलाखत दिली. या दोन्ही मुलाखतीत त्यानं वेगळी माहिती दिली. सुशांतच्या मृत्यूची माहिती वृत्तवाहिन्यांवरून समजली, असं संदीपनं एका वाहिनीला सांगितलं. तर दुसऱ्या वाहिनीशी बोलताना मृत्यूची माहिती फोनवरून समजल्याचा दावा केला. त्यामुळे संदीप काही लपवत आहे का, याची चौकशी सीबीआय करणार आहे.