Sushant Singh Rajput Death Case: ईडीला हवे आहेत डिजिटल पुरावे; माहितीची पडताळणी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 04:12 AM2020-08-15T04:12:02+5:302020-08-15T04:12:29+5:30
मुंबई पोलिसांना लिहिली चार पत्रे
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सुरू असलेल्या चौकशीदरम्यान रिया चक्रवर्तीसह अनेकांचे कॉल डिटेल्स काढण्यात आले. यातूनच हाती लागलेल्या माहितीच्या पडताळणीसाठी ईडीला सुशांतचा मोबाइल हवा आहे. मात्र मुंबई पोलिसांकडे त्यांनी चार वेळा पत्राद्वारे मोबाइलची मागणी केली आहे.
बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंद करून याप्रकरणी तपास सुरू केला आहे. यात ईडीने सुशांतची मैत्रीण रियासह तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीकडे केलेल्या चौकशीदरम्यान त्यांच्याकडील लॅपटॉप, मोबाइल ताब्यात घेतले. त्यानंतर आता सुशांतच्या मोबाइल व कॉल सीडीआरमधून त्यांना आर्थिक व्यवहाराची माहिती घ्यायची आहे. कारण, सुशांतच्या मोबाइलमध्ये नेट बँकिंग सुविधा होती.
सुशांतचा मोबाइल मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तो मिळावा यासाठी ईडीने त्यांच्यासोबत चार वेळा पत्रव्यवहार केला आहे. सुशांत प्रकरणात जप्त केलेले डिजिटल पुरावे देण्याची विनंतीही ईडीने केली आहे. मात्र मुंबई पोलिसांनी प्रतिसाद दिला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘ते’ सुशांत रियामधील शेवटचे संभाषण
रियाच्या कॉल रेकॉर्डनुसार, रिया व सुशांत ५ जून रोजी शेवटचे बोलले होते. रियाच्या म्हणण्यानुसार तिने तोपर्यंत सुशांतचे घर सोडले नव्हते. मात्र सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीत रियाने ८ जून रोजी घर सोडल्याचे नमूद आहे. ५ जून रोजी सकाळी ८.१९ वाजता सुशांतने रियाला फोन केला. दोघांमध्ये २ मिनिटांचे बोलणे झाले. त्यानंतर रियाने रात्री दहाच्या सुमारास सुशांतला फोन केला. तो तीन सेकंदांचा होता. हे त्यांचे शेवटचे संभाषण होते.