मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात दिवसागणिक नवे खुलासे होत आहेत. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाकडून सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचं नावदेखील घेतलं जात होतं. त्या प्रकरणी आदित्य ठाकरेंनी स्पष्टीकरण देत आपल्या या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं सांगितलं. यानंतर आता रियानंदेखील माध्यमांसाठी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.आदित्य ठाकरेंना मी कधीही भेटले नाही, असं रियानं निवेदनात म्हटलं. तिचे वकील सतीश माने शिंदेंनी हे निवेदन प्रसिद्ध केलं आहे. 'आदित्य ठाकरे कोण आहेत हे रियाला माहीत नाही. ती त्यांना कधीही भेटलेली नाही. तिनं त्यांच्यासोबत फोनवरून किंवा इतर कोणत्याही माध्यमातून कधीही संवाद साधलेला नाही,' असं स्पष्टीकरण रियाच्या वतीनं माने शिंदेंनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात आहे.सुशांत आणि रियाच्या नात्याची सुरुवात कशी झाली, याचाही माहिती निवेदनात आहे. 'एकाच क्षेत्रात काम करत असल्यानं सुशांत आणि रिया एकमेकांना काही वर्षांपासून ओळखायचे. त्यांच्यात मैत्रीचे संबंध होते. ते एकमेकांशी अधूनमधून बोलायचे. एप्रिल २०१९ मध्ये सुशांत एका पार्टीला गेला होता. त्यानंतर रिया आणि सुशांतनं डेट करण्यास सुरुवात केली. एकमेकांच्या घरात बरेच दिवस सोबत राहिल्यानंतर दोघे डिसेंबर २०१९ मध्ये वांद्र्यातल्या माऊंट ब्लँकमध्ये राहायला गेले. ८ जून २०२० पर्यंत रिया तिथे वास्तव्यास होती,' असा तपशील निवेदनात आहे.सुशांतच्या बहिण प्रियांकानं त्रास दिल्याचा आरोपदेखील माने शिंदेंनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात आहे. 'सुशांत आणि रिया एकत्र राहू लागल्यानंतर सुरुवातीला सुशांतची बहिण प्रियांका आणि तिचे पती सिद्धार्थ त्यांच्यासोबत राहत होते. एप्रिल २०१९ मध्ये एका रात्री रिया आणि प्रियांका पार्टीला गेले होते. त्यावेळी प्रियांका मद्यपान केलं होतं. खूप प्यायली असल्यानं ती पार्टीतील महिला आणि पुरुषांशी गैरवर्तन करत होती. त्यामुळे रियानं तिला घरी परतण्याचा आग्रह केला. त्यानंतर दोघी घरी परतल्या,' अशी माहिती निवेदनात आहे.'घरी आल्यानंतर प्रियांका मद्यपान करत होती. सुशांतही तिच्यासोबत पित होता. दुसऱ्या दिवशी चित्रिकरण असल्यानं रिया सुशांतच्या बेडरूममध्ये झोपायला गेली. मात्र खोलीत कोणीतरी आल्याची चाहूल लागल्यानं तिला जाग आली. त्यावेळी प्रियांका खोलीत काहीतरी शोधत होती. त्यावेळी रियानं तिला रुममधून तत्काळ निघून जाण्यास सांगितलं,' असा उल्लेख माने शिंदेनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात आहे.
Sushant Singh Rajput Death Case: अखेर मंत्री आदित्य ठाकरेंबद्दल रिया चक्रवर्तीनं मौन सोडलं; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 3:41 PM