मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवला आहे. तसा निकाल न्यायालयानं दिला आहे. मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारनं सीबीआयला सहकार्य करण्याच्या सूचनादेखील न्यायालयानं दिल्या आहेत. सुशांतच्या कुटुंबीयांनी सीबीआय तपासाची मागणी केली होती. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असताना सुशांतच्या बँक खात्याचा ऑडिट रिपोर्ट समोर आला आहे. त्यातून अतिशय महत्त्वाची उघड झाली आहे.सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांच्या खात्यातून नेमके किती व्यवहार झाले, याची माहिती मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांनी बँक खात्याचं फॉरेन्सिक ऑडिट केलं. त्याचा अहवाल काल पोलिसांना मिळाला. अकाऊंटिग आणि ऍडव्हायसरी फर्म ग्रँट थॉर्टोन सुशांतच्या बँक खात्याचं ऑडिट केलं. त्यामध्ये गेल्या ५ वर्षांमधील व्यवहारांचा तपशील आहे. विशेष म्हणजे सुशांत आणि त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीच्या खात्यात कोणताही व्यवहार झालं नसल्याचं अहवालातून समोर आलं आहे.सुशांत आणि रियाच्या खात्यांमध्ये कोणतेही आर्थिक व्यवहार झालेले नाहीत. सुशांतच्या खात्यातून रियाच्या खात्यात कोणतीही रक्कम जमा करण्यात आलेली नाही, अशी माहिती फॉरेन्सिक ऑडिटमध्ये आहे. सुशांतचे आर्थिक परिस्थिती उत्तम होती आणि त्यानं शेवटपर्यंत त्याच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतली, त्यांना वेळेवर पगार दिले, अशी माहिती मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील आवश्यक कागदपत्रं आणि पुरावे अंमलबजावणी संचलनायला (ईडी) देण्यात येतील, असंदेखील ते म्हणाले.ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे. २५ जुलैला सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी पाटण्यात रियाविरोधात तक्रार नोंदवली. रिया, तिचे कुटुंबीय यांच्यामुळे सुशांतनं आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे पाटणा पोलिसांनी रियासह आणखी काही जणांवर गुन्हा नोंदवला. त्यानंतर बिहार पोलीस तपास करण्यासाठी मुंबईत आले होते.
Sushant Singh Rajput Death Case: सुशांत-रियाच्या खात्यांमध्ये किती व्यवहार?; फॉरेन्सिक ऑडिटमधून महत्त्वाची माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 12:49 PM