Sushant Singh Rajput Death Case: मी सगळं स्वत: पाहिलंय, मला सुरक्षा द्या; कंगनानं व्यक्त केली मदतीची इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 10:11 AM2020-08-27T10:11:16+5:302020-08-27T10:25:59+5:30
Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात ईडी, सीबीआयनंतर एनएसबीची एंट्री
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मदत करण्याची इच्छा अभिनेत्री कंगना राणौतनं व्यक्त केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची मदत करायची आहे. पण त्यासाठी मला सुरक्षा देण्यात यावी, असं कंगनानं म्हटलं आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (एनसीबी) काल सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील अमली पदार्थांच्या वापराबद्दलची महत्त्वाची माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे. रियाच्या व्हॉट्स ऍप चॅटमध्ये अमली पदार्थांचा उल्लेख होता.
I am more than willing to help @narcoticsbureau but I need protection from the centre government, I have not only risked my career but also my life, it is quiet evident Sushanth knew some dirty secrets that’s why he has been killed.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 26, 2020
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असताना रियाच्या व्हॉट्स ऍप चॅटमध्ये अमली पदार्थांची खरेदी आणि वापराचा उल्लेख आढळला. त्यानंतर या प्रकरणी रिया आणि काही जणांविरोधात एनडीपीसी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यावर अभिनेत्री कंगना राणौतनं ट्विटरच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. 'मला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मदत करायची आहे. कारण मी सगळ्या व्यक्ती स्वत: पाहिल्या आहेत,' असं कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे. मला संरक्षणाची गरज असल्याचं तिनं पुढे म्हटलं. केंद्र सरकारनं मला संरक्षण द्यावं, अशी मागणी तिनं केली आहे.
'मला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मदत करण्याची इच्छा आहे. पण मला केंद्राकडून संरक्षणाची आवश्यकता आहे. माझी कारकीर्दच नव्हे, तर जीवही धोक्यात आहे. सुशांतला काही महत्त्वाची गुपितं माहिती असावीत. त्यामुळेच त्याची हत्या घडवण्यात आली असावी,' असा संशय कंगनानं व्यक्त केला आहे. कंगनानं आणखी एका ट्विटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे संरक्षणाची मागणी केली आहे. यानंतर 'कंगना राणौत को सुरक्षा दो' असा हॅशटॅगदेखील ट्विटरवर ट्रेंडमध्ये आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांचा रियावर गंभीर आरोप
अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा खून करण्यात आल्याचा दावा त्याचे वडील के. के. सिंह यांनी केला आहे. सिंह यांनी प्रथमच अभिनेत्री आणि सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तींवर अतिशय थेटपणे आरोप केले आहेत. रिया माझ्या मुलाची खुनी आहे. ती बऱ्याच कालावधीपासून माझ्या मुलाला विष देत होती. तिला आणि तिच्या साथीदारांना तातडीनं अटक करण्यात यावी, अशी मागणी सिंह यांनी केली आहे.
सुशांतच्या बहिणीची इन्स्टाग्राम पोस्ट
सुशांतला त्रास देण्यात आल्याचा आरोप त्याची बहिण श्वेता सिंह किर्ती यांनी इन्स्टाग्रामवरून केला आहे. याआधी सुशांतच्या कुटुंबियांनी रियावर आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता. मात्र आता त्यांच्याकडून रियावर हत्येचा आरोप केला जात आहे. सध्या या प्रकरणी सीबीआयचा तपास सुरू आहे. सुशांतसोबत काम करणाऱ्या अनेकांची चौकशी करण्यात आली आहे. सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, कूक नीरज यांची अनेकदा चौकशी झाली आहे.