सुशांतच्या आत्महत्येचा तपास नको तितका जास्त का खेचला?; संजय राऊतांचा मुंबई पोलिसांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 10:36 AM2020-08-09T10:36:27+5:302020-08-09T10:48:12+5:30

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात.

Sushant Singh Rajput did not have a good relationship with his father, said Shiv Sena leader Sanjay Raut | सुशांतच्या आत्महत्येचा तपास नको तितका जास्त का खेचला?; संजय राऊतांचा मुंबई पोलिसांना सवाल

सुशांतच्या आत्महत्येचा तपास नको तितका जास्त का खेचला?; संजय राऊतांचा मुंबई पोलिसांना सवाल

Next

मुंबई: अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput Case) यांच्या निधनाला आता एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे. आता सीबीआयने याप्रकरणी तपास सुरू केला आहे. सीबीआयने याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह एकूण 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, गुन्हेगारी षडयंत्र रचणे, चोरी-फसवणूक आणि धमकावणे यासारखे गुन्हे या सर्वांवर नोंदवण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणाला राजकीय वळण लागल्याने शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील आता या प्रकरणात उडी घेतली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून विविध प्रश्न उपस्थित करत संजय राऊत यांनी भाजपावरही निशाणा साधला आहे.

मुंबई पोलिसांनी हा तपास नको तितका जास्त खेचला. सिनेसृष्टीतील सेलिब्रिटीजना रोज चौकशीला बोलवायचे व ‘गॉसिप’ला वाव द्यायचा. या प्रकरणाचा वापर सिनेसृष्टीत दहशत निर्माण करण्यासाठी झाला काय ते पाहायला हवे, असं संजय राऊत यांनी सांगितले. सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे वेगळे का झाले? याचा तपास का झाला नाही? मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास नको तितका का खेचला? हे प्रकरण हाय प्रोफाईल होत असल्याचं दिसताच पोलिसांनी माध्यमांना त्याबाबत दिवसाआड माहिती का दिली नाही, असा सवाल करत संजय राऊत यांनी मुंबई पोलिसांनाही धारेवर धरले आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक ‘एफआयआर’ दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. त्याच वेळी दुसऱ्या राज्याचा काहीच संबंध नसताना त्यांनी समांतर तपास सुरू करावा हा मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास आहे' असं म्हणत संजय राऊत यांनी बिहार पोलिसांवर निशाणा साधला आहे.

सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूआधी त्याची मॅनेजर दिशा सॅलियन हिने आत्महत्या केली. दोन्ही प्रकरणे संपूर्ण वेगळी. पण राजकीय पुढारी दोन आत्महत्यांचा धागा जुळवत आहेत. दिशा सॅलियन हिच्यावर बलात्कार करून तिला इमारतीवरून फेकले, असा आरोप भाजपाचे एक पुढारी करतात तेव्हा त्यांनी तिच्या कुटुंबाचा थोडाही विचार केलेला दिसत नाही. दिशा सॅलियनच्या वडिलांनी एक पत्र लिहून याबाबत खंत व्यक्त केली. मृत्यूनंतर माझ्या मुलीची व आमच्या कुटुंबाची बदनामी का करता, हा तिच्या माता-पित्यांचा सरळ प्रश्न आहे. दिशा सॅलियन हिचे संपूर्ण कुटुंबच या बदनामीमुळे मानसिकदृष्टय़ा खचले आहे. तिचे वडील डिप्रेशनमध्ये गेले असे आता समोर आले' असंही संजय राऊत यांनी सांगितले. 

गोध्रा दंगल, त्या निमित्ताने झालेल्या हत्यांचा तपास सीबीआयकडे जाऊ नये, कारण सीबीआय म्हणजे केंद्रीय सत्ताधाऱ्यांचे राजकीय हत्यार असल्याचे मत तेव्हा मोदी-शहांचे होते. हेच मत सुशांत सिंग राजपूत प्रकरणात व्यक्त झाले तर काय चुकले?' असा सवाल करत राऊतांनी भाजपाला सणसणीत टोला लगावला. तसेच सुशांतच्या मृत्यूआधी दिनो मोरिया या अभिनेत्याच्या घरी एक पार्टी झाली. या पार्टीभोवती रहस्य निर्माण करून त्याचा संबंध सुशांतच्या मृत्यूशी जोडला गेला, असं संजय राऊत यांनी सांगितले.

दिनो मोरिया व इतर सिनेनट हे राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मित्रपरिवारातले आहेत व त्यामुळेच आरोपांच्या फैरी मुख्यमंत्री ठाकरे व आदित्य ठाकरेंवर झडत असतील तर ते चूक ठरेल. पुराव्याशिवाय बोलणे व आरोप करणे हे नैतिकतेस धरून नाही. पुरावे आहेत काय? हा पहिला प्रश्न. स्वतः आदित्य ठाकरे यांनी त्याबाबत खुलासा केला. तरीही शंका असतील तर त्यासाठी काही वृत्तवाहिन्यांना हाताशी पकडून बदनामी मोहीम राबवणे हा मार्ग आहे काय, असा थेट सवाल संजय राऊत यांनी भाजपाला केला आहे.

Web Title: Sushant Singh Rajput did not have a good relationship with his father, said Shiv Sena leader Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.