मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर सगळ्यांनाच धक्का बसला, बॉलिवूड, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सुशांतला श्रद्धांजली वाहिली. सुशांत राजपूतच्या पोस्टमोर्टम रिपोर्टनुसार गळफास लावल्याने त्याचा श्वास थांबला आणि त्यातून त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. गेल्या ६ महिन्यापासून सुशांत डिप्रेशनमध्ये होता असं त्याच्या जवळच्या मित्रांनी सांगितले.
सुशांत सिंग राजपूतच्या जाण्यानंतर पुन्हा एकदा मानसिक तणाव या विषयावर अनेकांनी भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. चंदेरी दुनियात सुशांत सिंग राजपूत हा पहिलाच सेलिब्रिटी नाही ज्याने आत्महत्या केली आहे यापूर्वीही अनेक जणांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. सुशांत राजपूतला श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्ताने माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनीही मोठा खुलासा केला आहे. ते जेव्हा खासदार होते त्यावेळी त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार आला होता असं ते म्हणाले.
काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, त्यांच्या मनातही आत्महत्या करण्याचा विचार आला होता, एका नव्हे तर दोनदा हा विचार डोक्यात आला. पहिल्यांदा लहानपणी तर दुसऱ्यांदा खासदार असताना त्यांनी आत्महत्येचा विचार केला होता. मात्र त्यानंतर त्यांनी दु:खासोबत जगायला शिकले. देवरा यांनी स्वत:च्या अनुभवातून ५ उपाय सुचवले आहेत. ज्यामुळे माणूस स्वत: या समस्येतून बाहेर निघू शकतो. हे उपाय महत्त्वाचे आहेत.
नैराश्यातून बाहेर येण्यासाठी मिलिंद देवरा यांनी सांगितलेले ५ उपाय
- आपण आपलं कुटुंब, मित्र, सहकारी, ओळखीच्या लोकांना भेटा, ज्या लोकांना आपण मनापासून हवे असतो.
- नैराश्य कोणालाही होऊ शकते. हे वय, लिंग, आर्थिक स्थिती, यश यावर अवलंबून नाही. म्हणून मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन करण्यास अजिबात संकोच करू नका.
- आपल्याला स्वत:च्या आतमध्ये असलेल्या सैतानविरूद्ध सतत लढावे लागते. कधीही हार मानू नका
- जीवन सुंदर आहे. पुढे जाण्याच्या शर्यतीत अडकू नका. ज्यात तुम्हाला सुख मिळते ते करा. संगीत, अन्न, प्रवास, आपले कार्य आणि आपल्या जवळच्या व्यक्तींची निवड करा, आयुष्य जगा
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर प्रेम करा.